मोठी बातमी! आता एसटी बसने कर्नाटकला जाता येणार नाही; 'या'मुळे घेतला महामंडळाने निर्णय
महाराष्ट्रातल्या एसटीला अडवून चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे घडली. या प्रकारानंतर महाराष्ट्रातील वातावरणही तापले. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आता या प्रकारानंतर एसटी महामंडळानेही मोठा निर्णय घेतला आहे.

काय झाले होते?
शुक्रवार (दि.२१) रात्री ९.१० वाजता मुंबई आगाराची बंगळुरू -मुंबई बस (क्र. MH14 K Q 7714) ही येत होती. चित्रदुर्गच्या अलीकडे दोन किलोमीटरवर ही बस आली असता कथित कर्नाटक संघटनेचे कार्यकर्त्यांनी ही बस अडवून बस चालकाला काळे फासल्याचा प्रकार केला . चालक भास्कर जाधव यांना या प्रकरणात मारहाणही करण्यात आली. कोल्हापूर आगारातील या चालक वाहकांनी वरिष्ठांच्या सुचनेनुसार चित्रदूर्ग पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली. आज सकाळी कोल्हापूरच्या विभाग नियंत्रकांनी संबंधीत चालक व वाहकाला सुखरुप कोल्हापूरला आणले.
महामंडळाने घेतला निर्णय
या प्रकारानंतर आता एसटी महामंडळही अँक्शन मोडवर आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने जखमी चालक भास्कर जाधव यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. तसेच प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा पहाता अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात येतील, असे आदेश मंत्री सरनाईक यांनी दिले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचे सांगितले.
काय म्हणाले मंत्री सरनाईक
या घटनेत जखमी झालेले चालक भास्कर जाधव यांच्याशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दूरध्वनीवर बोलून त्यांना धीर दिला. या प्रकरणात तुम्ही एकटे नसून सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहे, असेही सरनाईक यांनी जखमी कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्नाटक सरकार या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत नाही तोपर्यंत कर्नाटक राज्यात महाराष्ट्राच्या एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications