रिक्षाला वाचवताना ब्रेक दाबताच एसटी उलटली! 16 जण जखमी, 3 गंभीर, काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर
बुलढाणा - बुलढाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर तांदुळवाडी वळणानजीक आज सकाळी धावती एसटी बस उलटली. यामध्ये 16 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना बुलढाणा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी बस क्रमांक एमएच-40, वाय-5576 आज सोमवारी सकाळी 8:40 वाजता मलकापूर आगारातून प्रवासी घेऊन निघाली होती. एसटी बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते, या दुर्घटनेत सर्व प्रवासी बालंबाल वाचले असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

धरणगाव येथून बस सुरळीत धावत असताना पुढे थोड्याच अंतरावर 9:15 वाजता तांदुळवाडी वळणानजीक फौजी धाब्यासमोर अचानक ही बस महामार्गावरील दुभाजकावर उलटली.
प्रवाशांना जबर धक्का
हा अपघात अचानक घडल्याने बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसला. तर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जीवितहानी टळली मात्र चालकासह सोळा प्रवासी जखमी झाले.
हे झाले जखमी
बसमधील शरद बारसू झोपे रा. तळणी, गोविंद भास्कर नारखेडे रा. बोराखेडी, वर्षा माधव भारंबे रा. नरवेल, माधव नारायण भारंबे रा. नरवेल, मंदा पंजाबराव देशमुख, वैष्णवी पंजाबराव देशमुख रा. वसाडी नांदुरा, रचना प्रभाकर वले रा. कुर्हा, शोभा परमेश्वर पांडे रा. पैसोडा, गणेश ज्ञानदेव चेंडाळणे रा. मानकी, चालक खुशाल हनुमंतराव देशमुख (वय 35) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिघेजण गंभीर
त्यापैकी गोविंद भास्कर नारखेडे, माधव नारायण भारंबे व मंदा पंजाबराव देशमुख यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले. याखेरीज उर्वरित जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
असा घडला अपघात
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, महामार्गावर तांदुळवाडी वळणमार्गावर बस धावत असताना अचानक प्रवासी वाहतूक करणारी ऑटोरिक्षा रस्त्याच्या मधोमध पुढे आली. तिला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावला. तो इतका जोमाने लागला की धावती बस अचानक रस्त्यावर थांबली.
घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिस, एमआयडीसी पोलिस व राज्य परिवहन महामंडळाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. तर महामंडळाच्या पथकाने जखमींची अपडेट घेत प्रवाशांना धीर दिला. या घटनेत जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications