अब्दुल सत्तार; 57 हजार महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देणारा नेता, ग्रामपंचायत ते मंत्री असा प्रवास
Sillod Assembly election Abdul Sattar Biography Political Career : अब्दुल सत्तार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव आहे. साध्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अब्दुल सत्तार यांनी नगराध्यक्ष आणि नंतर आमदार व मंत्री असा मोठा राजकीय पल्ला पार केलेला आहे. प्रचंड लोकसंपर्क आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्यामुळे सिल्लोड मतदारसंघातून त्यांना गेल्या तीन निवडणुकांत जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आणि 2024 या विधानसभा निवडणुकीतही ते शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मधून पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत.
1984 साली ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून अब्दुल सत्तार राजकारणाच्या रिंगणात आले. नंतर त्यांनी तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. 1994 साली सिल्लोड शहराचे नगराध्यक्ष म्हणून निवडले गेले. 1999 साली विधानसभा निवडणूक लढण्याकरिता त्यांनी काँग्रेसशी संपर्क केला मात्र त्यांना त्यात यश आले नाही आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2004 साली त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आणि फक्त तीनशे एक मतांनी त्यांचा पराभव झाला.

2009 साली मात्र त्यांना विजयश्री गवसली आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ते 30 हजार मतांनी विजयी झाले. 2014 सालीही त्यांनी पुन्हा विजयश्री संपादन केली. विधानसभेच्या दुसरा कार्यकाळ देखील त्यांनी गाजवला. 2019 साली काँग्रेस पक्षाकडून लोकसभेचे तिकीट मिळेल, अशी त्यांना आशा होती मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले आणि सत्तार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले तेव्हा त्यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली. मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे सत्तार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री
2019 साली ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांना उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. महसूल, ग्रामीण विकास, बंदर विकास, खारभूमी विकास आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2020 साली ते धुळ्याचे पालकमंत्री झाले. मात्र 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात सत्तार यांनी शिंदे यांना साथ दिली आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांना वक्फ व अल्पसंख्याक कल्याण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. 2024 साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकरिता एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना पुन्हा सिल्लोड मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. सत्तार हे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते.
मतदारसंघात अनेक विकासकामे
आपल्या मंत्रीपदाचा सिल्लोड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अब्दुल सत्तार यांनी चांगलाच उपयोग करून घेतला. छोटे बंधारे आणि साठवणूक टाक्या उभारणीसाठी १०० कोटी रुपयाचा निधी मतदार संघात खेचून आणण्यात अब्दुल सत्तार यांना यश आले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातच कृषी महाविद्यालय मंजूर करून घेण्यात देखील अब्दुल सत्तार यशस्वी ठरले.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील अनेक महत्त्वाचे रस्ते देखील सत्तार यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आले आणि ते पूर्णत्वास गेले. सिल्लोड शेगाव विधानसभा मतदारसंघात सामान्य रुग्णांना 24 तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सरकार दरबारी तसेच खाजगी संस्था आणि स्वयंसेवी संस्थांची संपर्क साधला. आणि अशा रुग्णवाहिका मतदारसंघात उपलब्ध करून दिल्या.
लाडकी बहिण योजनेचा 57 हजार महिलांना लाभ
माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांची आणि महत्त्वपूर्ण योजना आहे. राज्यातील महिलांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली असून दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. पात्र लाभार्थी महिलांना प्रतिमा दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेत आतापर्यंत तीन हप्ते सरकारने दिले आहेत अजूनही या योजनेसाठी महिलांची नोंदणी सुरू आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघातून तब्बल 57 हजार महिलांना लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे महिलांची मोठी ताकद सत्तार यांच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडासंकुल
छत्रपती संभाजी नगर शहरात आमखास मैदानाची मोठी जागा आहे. या जागेवर सभा, संमेलने आणि सोहळे होत असत. या जागेवरच भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी घेतला. तसेच क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याशी बैठक घेऊन हे संकुल उभारणीबाबत सविस्तर चर्चा केली तसेच प्रस्तावित संकुलाचा आराखडा सादर करण्याचे आदेश दोन्ही मंत्र्यांनी छत्रपती संभाजी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
चौथा विजय सुकर
थेट स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा आणि लोकांची कामे झपाट्याने करण्याची वृत्ती यामुळे अब्दुल सत्तार मतदार संघात सर्व धर्मीयांमध्ये लोकप्रिय आहेत. ग्रामपंचायत ते राज्याचा मंत्री असा प्रदीर्घ प्रवास गेल्या 40 वर्षात केलेला असल्यामुळे तळागाळातील समस्यांची आणि प्रशासनाची चांगलीच जाण आहे. काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश केलेला असला तरी त्यांच्या लोकप्रियता तसुभरही घट झालेली नाही.
महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्याशिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 57 हजार महिलांची नोंदणी झाल्यामुळे अधिकची ताकद सत्तार यांच्या पाठी उभी राहिलेली आहे यामुळे सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सत्तार यांचा सलग चौथा विजय सुकर होईल असा येथील जाणकारांचा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications