शिवसेना नेते संदीपान भूमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळणार
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेला मुंबई, ठाणे आणि कोकणापाठोपाठ मराठवाडा परिसराने सर्वाधिक साथ दिली. छत्रपती संभाजी नगर जिल्हा शिवसेनेसाठी खूपच पूरक राहिलेला आहे. छत्रपती संभाजी नगर शहरसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही शिवसेना चांगलीच बहरली. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसणाऱ्या अनेक तरुणांनी मराठवाड्यातून शिवसेनेचे नेतृत्व केले. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघ देखील शिवसेनेच्या ताब्यात आहे.
2009 साली या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय वाघचौरे निवडून आले होते. पण 2014 साली संदीपान भुमरे यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे खेचून आणला. 2019 साली पुन्हा भुमरे यांनी विजयाची पुनरावृत्ती केली आणि भुमरे यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद देखील मिळाले. पण 2022 साली भुमरे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही भुमरे यांना मंत्रीपद देण्यात आले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघ जिंकून घेतला. या मतदारसंघात त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने यांचे पुत्र विलास भुमरे यांना संधी दिली आहे.
विलास भुमरे यांची स्वतंत्र ओळख
विलास भुमरे हे संदिपान भुमरे यांचे पुत्र असले तरी त्यांनी मतदारसंघात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पैठण परिसरात त्यांना बापू या टोपण नावाने ओळखले जाते. विलास भुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम उभारले आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या विविध कृषी विषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांना विलास भुमरे यांची जातीनिशी उपस्थिती असते. संदीपान भुमरे यांच्या वतीने जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात विलास भुमरे यांचा चांगलाच पुढाकार होता. छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत देखील कार्यरत होते.
संदीपान भुमरे यांची पुढची पिढी या निमित्ताने पैठणच्या राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय होत आहे. विशेष म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात येत असला तरी हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. पण 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता त्यांच्या कन्या संजना जाधव ह्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढत आहेत.
महायुतीकडून अनेक विकासकामे
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पैठण विधानसभा मतदारसंघ तसेच आसपासच्या परिसरात अनेक विकासकामे केली आहेत. पैठण ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या शहरांना जोडतो. या महामार्गामुळे दोन्ही शहरादरम्यानच्या भागात आर्थिक प्रगतीला चालना मिळत आहे. पैठण येथील प्रसिद्ध नाथ मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येत असून भविष्यात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या आणखीन वाढणार आहे. खेरडा येथे उभारण्यात येत असलेला प्रकल्प तालुक्यातील सिंचनासाठी मोठी सुविधा उपलब्ध करून देणार आहे तसेच कृषी क्षेत्रासाठी होणारा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पित्याची पुण्याई फळाला येणार
2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळी संदीपान भुमरे या विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. दोन्ही वेळा ते पूर्णवेळ सरकारमध्ये आहेत. 2019 पासून उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळात तसेच एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही संदिपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. त्यानंतर ते खासदार देखील झाले. या कालखंडात संदिपान भुमरे यांची बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी केला. मात्र भुमरे यांची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही.
सत्ता पदांचा उपयोग करून भुमरे यांनी सरकारच्या विविध विकास योजना पैठण विधानसभा मतदारसंघात राबवल्या आहेत. विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेसाठीही पैठण विधानसभा मतदारसंघातून चांगली नोंदणी करण्यात आली आहे. भुमरे यांच्या या पुण्याईचा लाभ त्यांचे पुत्र विलास भुमरे यांना विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. विलास भुमरे यांनी निवडणूक प्रचाराला झंझावाती सुरुवात केली असून त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications