शिवसेनेचा अपराजित योद्धा रवींद्र वायकर; सलग 32 वर्षांपासून विजयी, नगरसेवक ते खासदार अशी झेप
ShivSena Leader Ravindra Waikar Corporator to MP : शिवसेनेच्या स्थापनेपासून नंतरच्या दहा वर्षात शिवसेनेने मुंबई शहर आणि परिसर स्वतःचा बालेकिल्ला बनवला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि संघटनेचे सामाजिक काम यांच्यामुळे हजारो तरुण शिवसेनेच्या गोतावळ्यात दाखल झाले. मुंबई शहराबरोबरच मुंबई उपनगर परिसरातही शिवसेना झपाट्याने पसरली. पश्चिम उपनगर परिसरात शिवसेनेच्या विस्ताराचा वेग तुलनेने अधिक होता. मराठी मध्यमवर्गीयांनी शिवसेनेला विशेष जनाधार दिला. 1993 च्या दंगलीनंतर शिवसेनेचे मुंबईतील स्थान आणखी भक्कम झाले. पश्चिम उपनगरात जोगेश्वरी परिसरातून शिवसेनेला सातत्याने यश मिळवून देणारा शिवसैनिक म्हणजे रवींद्र दत्ताराम वायकर.
1992 सालापासून रवींद्र वायकर हे जोगेश्वरी परिसरातून सातत्याने अपराजित शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. 1992 साली ते शिवसेनेच्या तिकिटावर सर्वात प्रथम नगरसेवक म्हणून ते निवडून आले. 1997 साली पुन्हा याच परिसरातून त्यांचा विजय झाला. 2002 झाली पुन्हा ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. 2007 सालीही त्यांचा विजय झाला.

2006 ते 2010 या काळात ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 2009 मध्ये शिवसेनेने त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आणि पहिल्याच प्रयत्नात ते विधानसभेवर निवडून गेले. 2014 साली पुन्हा त्यांची आमदार म्हणून निवड झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री तसेच गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 2019 सालीही त्यांचा पुन्हा विजय झाला.
अवघ्या 48 मतांच्या फरकाने खासदार
2019 साली उद्धव ठाकरे यांनी भाजपशी असलेली युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी तडजोड केली. या तडजोडीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री झाले. शिवसेनेने अनिल परब, सुभाष देसाई यांना मंत्रिपदे दिली. त्या काळात नगर विकास खात्याचे मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांची पक्षात घुसमट झाली आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. आठ मंत्रीही त्या बंडात सहभागी झाले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही पक्षाची निशाणी सर्वच न्यायिक व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांना देण्यात आली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले. पण लोकसभा निवडणुकीच्या आधी काही काळ त्यांचा अधिकृत शिवसेनेत प्रवेश झाला. आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या निवडणुकीत त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला.
जोगेश्वरी परिसरात विविध विकासकामे
जोगेश्वरी परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबवणारा नेता म्हणून रवींद्र वायकर यांची पश्चिम उपनगरात ओळख आहे. जोगेश्वरी पूर्व येथे उभारण्यात आलेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारण्यात रवींद्र वायकर यांची महत्त्वाची भूमिका होती. या रुग्णालयाची उभारणी होताच रवींद्र वायकर यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिका या रुग्णालयाला भेट दिली तसेच सेवन हिल्स हॉस्पिटललाही एक रुग्णवाहिका भेट म्हणून देण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल
जोगेश्वरी हा परिसरात अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. पूर्व आणि पश्चिम जोगेश्वरीला जोडण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाची निर्मिती रवींद्र वायकर यांनी केली आणि त्या माध्यमातून रस्त्यासारख्या पायाभूत सुविधा जोगेश्वरी परिसरात अधिक मजबूत केल्या. मुंबई शहर झपाट्याने वाढत असून या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेऊन रवींद्र वायकर यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे जोगेश्वरी परिसराचा पाणी प्रश्न निकाली निघाला.
इ-लायब्ररी
एमपीएससी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या जोगेश्वरी मधील विद्यार्थ्यांसाठी वायकर यांच्या पुढाकारातून इ लायब्ररी उभारण्यात आली. तसेच पुनम नगर येथील महापालिकेच्या शाळेची सुधारणा करण्यात येऊन तिथे सीबीएसई अभ्यासक्रम वायकर यांच्या पुढाकारातूनच सुरू करण्यात आला. जोगेश्वरी परिसरात रस्ते, सांडपाणी व्यवस्था, फुटपाथ, उद्याने आदींचा विकास करण्यात रवींद्र वायकर यांचा महत्त्वाचे योगदान आहे. परिसरात राबवलेल्या विकासकामामुळे गेल्या 32 वर्षात त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही. 1992 सालापासून सलग एवढे विजय मिळवणाऱ्या आणि साध्या नगरसेवकापासून खासदारापर्यंत प्रवास केलेला रवींद्र वायकर हा अस्सल शिवसैनिक आहे.
पत्नी विधानसभेच्या रिंगणात
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून संधी दिली आहे. जोगेश्वरी पूर्व परिसरात रवींद्र वायकर यांचा अफाट जनसंपर्क आहे. सलग तीन वेळा याच विधानसभा मतदारसंघातून त्यांनी शिवसेनेचा झेंडा फडकवला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केल्यामुळे भाजप शिवसेनेपासून दुरावला होता. परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेना आणि भाजपा युती पुन्हा अस्तित्वात आली आहे. त्यामुळे नाराज झालेला भाजपचा मतदार पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहणार आहे त्यामुळे मनीषा वायकर यांच्यासाठी जोगेश्वरी पूर्व मधून विजय मिळवणे तुलनेने अधिक सोपे आहे.












Click it and Unblock the Notifications