एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराने केली भाजप कार्यकर्त्यास मारहाण, हिशोब चुकता म्हणत जीवे मारण्याची धमकी
रस्त्याच्या कामावरुन वाद झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याने वैजापूर पोलिस ठाणे गाठले, परंतु, त्यांची तक्रार राजकीय दबावापोटी घेतली जात नाही, असा आरोप कैलास पवार यांनी केला. ते काही माध्यमांशी बोलत होते. ठाण्याबाहेर त्यांनी तीन तास ठिय्या दिला परंतु, त्यांची तक्रार अद्याप घेतली गेली नाही, असाही आरोप पवार यांनी केला.
कैलास पवार यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, त्यांच्या राहत्या घरासमोर रस्त्याचे काम सुरू आहे. तेव्हा पवार हे प्लॉटवर गेले असता तेथे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह काही कार्यकर्ते हे अगोदरच उपस्थित होते. यावेळी नगर पालिकेचे इंजिनिअर देखील उपस्थित होते. या ठिकाणी रस्त्याच्या कामावरुन तक्रारीचे निवारण सुरू असताना हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

शिवीगाळ अन् मारहाण
भाजप कार्यकर्ते कैलास पवार म्हणाले की, आमदार बोरनारे यांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता करा असे ठेकेदाराला ठणकावून सांगितले. यानंतर भाजप कार्यकर्ते कैलास पवार यांनी इंजिनिअर यांना रस्ता करण्यापूर्वी एन-ए लेआऊट बघून घ्या असे सांगितले.
यावर आमदार बोरनारे यांनी शिवीगाळ केली. तुझा जुना हिशोब चुकता करायचा आहे, तुला इथे राहू देणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांसह मारहाण केली अशी लेखी तक्रार कैलास पवार यांनी दिली. आमदार बोरनारे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याने सदर घटनेची पोलिसांनी घेतली नसल्याचे पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.
भाजप कार्यकर्ते कैलास पवार काय म्हणाले?
भाजपचे कार्यकर्ते कैलास पवार यांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या बंगल्याशेजारी रस्त्याचं काम सुरू होतं. त्या ठिकाणी आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते होते. रविवारी सुट्टी असूनही नगरपरिषदेचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी आमदारांनी प्लॉट नंबर 48 मधून रस्ता काढण्याचे आदेश इंजिनिअरला दिले.
त्यावर आपण ले आऊट बघायला सांगितले. विशेष म्हणजे हा ररस्ता ले आऊटमध्ये नाही. त्यावर आमदार चिडले आणि त्यांनी मला धमकी दिली. तू खूप दिवसांपासून आमच्या डोक्यात आहेस. तुझी फॅमिली संपवायची आहे, असं सांगत त्यांनी मला मारहाण केली. आमदार बोरनारे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी म्हटले.
3 तासांपासून वैजापूर ठाण्यात, पण तक्रार घेईना पोलिस
भाजप कार्यकर्ते कैलास पवार म्हणाले की, मी गेल्या तीन ते चार तासांपासून वैजापूर पोलिस स्टेशनमध्ये बसलो असून तक्रार दाखल करुन घेतली नाही. चौकशी करून गुन्हा दाखल करू असं उडवाउडवीचे उत्तर पोलिस देत आहेत, मुळात आमदार बोरनारे यांच्याकडून पोलिसांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार बोरनारे काय म्हणाले?
या प्रकरणी आमदार बोरनारे यांनी एका मराठी वृत्तवाहिणीशी फोनवरुन संवाद साधला. एबीपी माझानुसार, आमदार बोरनारे म्हणाले की, माझ्याकडे काही नागरिक रस्त्याची अडचण असल्याचा अर्ज घेऊन आले होते. त्या अर्जानुसार आपण नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. ते घटनास्थळी नकाशा बघत अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना कैलास पवार तेथे आले. त्यांनी आपल्याशी आणि आपल्या कार्यकर्त्यांशी अरे-तुरेची भाषा केली. त्यानंतर वाद झाला. पण जीवे मारण्याची धमकी देणे हा विषयच नाही. उलट मीच त्यांना समजावून सांगत होतो.












Click it and Unblock the Notifications