700 चौरस फुटापर्यंत कर माफ, 100 युनिट वीज मोफत; दरमहा ₹ 1500 , ठाकरेंचा मुंबई निवडणूकीसाठी जाहीरनामा
Shiv sena ubt mns manifesto mumbai election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज दोन मोठ्या पक्षांनी आपले पत्ते उघड केले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस पाडला आहे. विशेषतः ७०० स्क्वेअर फुटांपर्यंत मालमत्ता कर माफी आणि महिलांसाठी विशेष योजनांवर दोन्ही पक्षांनी भर दिला आहे.

शिवसेना (UBT) आणि आदित्य ठाकरेंच्या प्रमुख घोषणा
कर माफी आणि सवलती
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, ५०० स्क्वेअर फुटांनंतर आता ७०० स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर (Property Tax) पूर्णपणे माफ करण्याची घोषणा. तसेच १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन.
मनपा शाळांतच काॅलेज
महापालिकेच्या शाळांमध्येच ज्युनिअर कॉलेज सुरू करणार. सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य असेल. मराठी भाषा आणि शिक्षणाप्रती जाहीरनाम्यात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
स्वयंरोजगाराबाबत मोठी घोषणा
तरुणांना स्वंयरोजगार मिळावा यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे प्रयत्नशील आहे, या अनुशंगाने त्यांनी १ लाख तरुण-तरुणींना २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत 'स्वयंरोजगार सहायता निधी' दिला जाणार असे आपल्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.
मुंबईत गिफ्ट सिटी प्रकल्प
केंद्र सरकारच्या ताब्यात असलेली मुंबई पोर्ट ट्रस्टची १८०० एकर जमीन मुंबईकरांच्या हक्कासाठी मिळवणार. तिथे 'गिफ्ट सिटी'सारखे प्रकल्प राबवणार असे जाहीरनाम्यातून सांगण्यात आले आहे.
वाहतूक आणि पार्किंगबाबत घोषणा
मुंबईत मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणार. पादचाऱ्यांसाठी हक्काचे फुटपाथ आणि मोकळ्या जागांवर भर.
आदित्य आणि अमित ठाकरेंचा 'व्हिजन' प्लॅन
आरोग्य सेवा: मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा मानस. आजाराचे लवकर निदान व्हावे, यासाठी ही सुविधा असेल.
महिला सुरक्षा आणि सुविधांसाठी पुढाकार : प्रत्येक विधानसभा क्षेत्रात पाळणाघर सुरू करणार. घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीरनाम्यातून सांगण्यात आले आहे.
माँ साहेब किचन योजना : कोळी महिलांना 'माँ साहेब किचन'च्या माध्यमातून अवघ्या १० रुपयांत जेवण उपलब्ध करून देणार.
बेस्ट बस तिकीट दर कमी : बेस्ट बसच्या तिकिटांचे दर कमी करून ५, १०, १५ आणि २० रुपये असे 'फ्लॅट रेट' करणार.
जाहीरनाम्यातील 'गेम चेंजर' मुद्दे
दोन्ही पक्षांनी मध्यमवर्गीय आणि कष्टकरी मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी मालमत्ता कर, पाणी आणि वीज या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित केले आहे. आदित्य ठाकरेंनी पर्यावरणासाठी 'क्लायमेट ऍक्शन प्लॅन' आणि वार्डनिहाय मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची घोषणा करून तरुणाईला साद घातली आहे.












Click it and Unblock the Notifications