shikhar bank scam case : अजित पवारांची चिंता वाढली! शिखर बॅंक घोटाळा क्लिन चिट विरोधात 4 याचिका दाखल
shikhar bank scam case: : शिखर बँक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.. अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती, त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आलं आहे. चार नवीन स्वतंत्र याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात 5 आॅक्टोबरला महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांविरोधातील खटला बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती.

त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर ईडीने यावर आक्षेप घेतला तसेच याला विरोध करणाऱ्या चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर येत्या 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
ईओडब्ल्यूने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना शिखर बॅंक घोटाळा प्रकरणात 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी या सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली होती. त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनी न्यायालयात धाव घेतली. तर आता चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत.
माणिक भीमराव जाधव, अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ असराजी साबळे, रामदास पाटीबा शिंगणे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत चार स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या आहेत. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. आता येत्या 5 ऑक्टोबरला या प्रकरणी सुनावणी होणार असून, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(shikhar bank scam case)












Click it and Unblock the Notifications