शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! हा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार नितेश राणेंची थेट घोषणा
Sharad Pawar's leader Prashant Yadav will join BJP : रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठे खिंडार पडणार असून शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आता भाजपमध्ये जाणार आहेत. येत्या 19 ऑगस्टला मुंबईत हा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, यासंदर्भात थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज जाहीररित्या घोषणा केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. 19 ऑगस्टला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. मंत्री नीतेश राणे यांनी आज सकाळी चिपळूणमधील पिंपळी इथल्या वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित करण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शरद पवारांच्या नेत्यावर नितेश राणेंचे स्तुतीसुमनं
'प्रशांत यादवांनी वाशिष्ठी डेअरी उभारून, त्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम केलं असून, अनेकांना रोजगार दिला आहे. त्यांच्याकडे आम्ही कार्यकर्ता म्हणून नव्हे, तर नेते म्हणून पाहतो. असा मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर नक्कीच आम्हाला फायदा होईल,' असं राणे या वेळी म्हणाले. या वेळी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासह भाजपचे काही नेते उपस्थित होते.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीविरोधात लढवली होती निवडणूक
दरम्यान प्रशांत यादव यांनी गेल्याच निवडणुकीत स्थानिक नेते तथा आमदार शेखर निकम हे महायुतीतच असून, त्यांच्याविरोधात यादव यांनी निवडणूक लढवली होती. आता यादव यांचाच भाजपमध्ये प्रवेश होत आहे, त्यामुळे शेखर निकम यांच्या गडात आणखी एक महायुतीत नेता सामिल होत आहे, या मतदारसंघात अजित पवारांचे नेते निकम हे आमदार आहेत, त्यामुळे आगामी काळात येथे भाजप स्वबळावर लढू शकतो. "प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. स्वबळावर लढलो, तरच आमची ताकद वाढेल" असे स्पष्ट संकेत नितेश राणे यांनी दिले आहेत. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला हा एक धक्का आहे असे मानले जात आहे.
कोण आहेत प्रशांत यादव?
- प्रशांत यादव हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत.
- प्रशांत यादव यांचा चिपळून भागात मोठा जनाधार आहे.
- गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून चिपळूण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
- महायुतीकडून उभे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) शेखर निकम यांच्याकडून ते ६ हजार ८६७ मतांनी पराभूत झाले होते.












Click it and Unblock the Notifications