विधानसभेसाठी शरद पवारांचा 'गेम' ठरला, हे तरुण चेहरे मैदानात
शरद पवार. वय वर्षे फक्त 83. ज्या वयात इतर लोक आराम करतात, त्या वयात पवार महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा हाकतात. कुणी काहीही म्हणो, आपल्या अनुभवानं सोंगट्या फिरवायच्या आणि काम फत्ते करायचं, एवढंच त्यांना माहित. आरोप होवूद्यात, पक्षात फाटाफूट होवूद्यात, शिव्याशाप मिळूद्यात, हा माणूस शांतपणे जे ठरवलंय, ते पूर्ण करत असतो.
आता काल सांगलीत त्यांनी विधानसभेचा बिगूल वाजवत, आपल्या पहिल्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलं. स्व. आर. आर. आबांच्या मुलाला, म्हणजेच रोहित पाटलांना निवडून आणा म्हणत, त्यांनी कवठे महांकाळकरांना भावनिक साद घातली. रोहित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पहिले उमेदवार ठरलेत.

शरद पवारांचा पहिला उमेदवार आणि त्याचं वय पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, याची कल्पना येते. तुटफूटीनंतर पवार साहेब आता पक्ष नेमका कसा बांधणार, याचा अंदाज येतो. शरद पवारांच्या नव्या पक्षाच्या बांधणीच्या डावपेचांचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.
रोहित पाटलांना उमेदवारी
रोहित पाटील तासगाव- कवठे महांकालचे. फक्त 25 वर्षांचे. काही दिवसांपूर्वीीच त्यांनी आपला 25 वा वाढदिवस साजरा केलाय. याच मतदारसंघात त्यांचे वडिल स्व.आर. आर. आबा 1991 ते 2015 असे सलग 24 वर्षे आमदार होते. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी त्यांची ओळख होती. शरद पवारांसोबतच काँग्रेस सोडत स्व. आबांनी शरद पवारांना शेवटपर्यंत साथ दिली.
त्याचीच पावती म्हणून पवार साहेबांनी आबांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना तासगाव विधानसभेतून संधी दिली. सध्या सुमनताई याच तेथील आमदार आहेत. यावेळी पुन्हा त्यांनाच तिकीट मिळेल अशी शक्यता असताना, काल शरद पवारांनी त्यांचा मुलगा रोहित पाटलांचं नाव डिक्लेअर करुन टाकलं. नव्या रक्ताला संधी देत पक्षाची पुनःर्बांधणी करायचीय, हेच सध्या पवारांच्या डोक्यात असल्याचं त्यातून दिसलं.
मागच्यावर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 41 आमदारांनी सत्तेत जागा मिळवली. शरद पवार फक्त 15 आमदारांचा गट घेऊन विरोधी बाकांवर बसले. दोन्ही गटांनी आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, म्हणून निवडणूक आयोगात धाव घेतली. बरेच महिने ही सुनावणी सुरु होती.
अखेर घड्याळ चिन्ह अजितदादांना मिळालं, तर तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगाने शरद पवारांना दिलं. विशेष म्हणजे कालच म्हणजे सोमवारीच निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकांसाठीही कायम ठेवलं. तो निकाल येऊन काही तास उलटत नाहीत तोच शरद पवारांनी आपला पहिला उमेदवारही जाहीर केला.
गेली पाच दशकं राज्याच्या व देशाच्या राजकारणात असणाऱ्या शरद पवारांच्या डोक्याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. स्वतः सुप्रिया सुळेही हे जाहीरपणे सांगतात. त्याच शरद पवारांचा पहिला उमेदवार पाहिला, तर नवीन चेहरे घेऊन त्यांना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करायचीय, हे स्पष्ट दिसते.
विधानसभेसाठी तरुण चेहऱ्यांना संधी
पवार साहेब अगदी तिशी-चाळीशीतले युवा चेहरे घेऊन, विधानसभेच्या रणांगणात उतरतील, ही शक्यता यामुळे वाढते. शरद पवार गटातील विद्यमान आमदार पाहिले तरी हे सहज लक्षात येते. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे 47 वर्षांचे आहेत. यावेळीही त्यांच तिकीट फिक्स समजलं जातं. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे 38 वर्षांचे आहेत. त्यांचही तिकीट फिक्स समजलं जातं.
दुसरीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभेसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. लंके हेही 44 वर्षांचे आहेत. आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांचंही तिकीट फायनल होऊ शकतं. त्या फक्त 40 वर्षांच्या आहेत.
येत्या विधानसभेला शरद पवार हे युवा चेहऱ्यांवर डाव लावतील, याचा अंदाज रोहित पवारांनीही दिला होता. 28 जूनला प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अजितदादा गटाचे 22 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं.
मात्र त्यातील पक्त 10 ते 12 आमदारांनाच पवार साहेब सोबत घेतील, असंही स्पष्ट केलं होतं. आता अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचा विचार केला, तर 41 पैकी 10-15 आमदार हे चाळीशीच्या आतले आहेत. तेच आमदार कदाचित, पवार साहेब सोबत घेतील, असाही अर्थ लावला जावू शकतो. एकंदर रोहित पाटलांची उमेदवारी पाहता शरद पवारांना नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवायचाय हे स्पष्ट झालंय.












Click it and Unblock the Notifications