शरद पवारांनी उमेदवारांची घेतली तातडीने ऑनलाईन मिटिंग, कारण काय..?
Online meeting of Sharad Pawar- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा उद्या म्हणजेच शनिवारी निकाल आहे. कुणाचे सरकार येईल, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, महायुती व महाविकास आघाडीने आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी पावले उचललेली दिसत आहेत. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानेही तातडीने आपल्या सर्व उमेदवारांची ऑनलाईन मिटींग घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांनी घेतली ऑनलाईन मिटींग
उद्या शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. त्याआधीच शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मिटींग घेतली. या बैठकीला शरद पवारांसह सुप्रिया सुळे व जयंत पाटील यांनीही मार्गदर्शन केल्याची माहिती मिळत आहे. निकालापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी ही मिटींग घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, निकाल लागल्याबरोबर प्रमाणपत्र घेऊन शरद पवारांनी त्यांच्या सर्व उमेदवारांना मुंबईला बोलावले आहे. आपले आमदार सुरक्षित ठेवण्यासाठी शरद पवार गटाने ही रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.
पवारांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीला १५७ जागा मिळतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची उत्कंठा राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यातच आता शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिंदे-फडणवीसांकडूनही जुळवाजूळव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही निकालापूर्वीच अँक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहेत. त्यांनी आपल्या एका विश्वासू नेत्यावर अपक्ष उमेदवारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी सोपवली असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांना पुन्हा आपलेच सरकार येईल, अशी खात्री आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रीय झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी पालघर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केल्याची माहिती आहे. त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमवाजमव करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications