शरद पवारांची डोकेदुखी वाढली; इंदापूरातलं वारं फिरलं, बंडखोरांची रेकाँर्डब्रेक सभा
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला. मात्र शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांना हा पक्षप्रवेश आवडला नाही. शरद पवार गटाच्या नेत्यांनी आज इंदापुरात रेकाँर्डब्रेक मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केलं. या मेळाव्यात शरद पवार गटाचे नेते दशरथ माने यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांना थेट इशाराच दिला. हर्षवर्धन पाटीलांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलला नाही तर, भारतातील सर्वात मोठी बंडखोरी इंदापुरात होईल, असं म्हणत माने यांनी थेट शरद पवारांनाच ललकारलं.
काय म्हणाले दशरथ माने
या मेळाव्यात बोलताना दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटलांवर निशाणा साधला. ते म्हणाले, तो चांगला दिसतो उंच दिसतो, म्हणून मग त्याला (हर्षवर्धन पाटील) आमच्या बोकांडी का बसवता..? तो आमच्या तंबूत का घुसतोय? तो सगळ्या पक्षाचं थोडंथोडं खातोय. साहेब म्हणत होते की, नवीन चेहऱ्यांना संधी देईन. मग हा काय नवीन चेहरा आहे का..? आम्ही काय फक्त गवत उपटत राहायचं का..?" असा खोचक सवाल दशरथ माने यांनी शरद पवारांना उद्देशून केला. उमेदवारी बदलली नाही तर देशातील सगळ्यात मोठी बंडखोरी शरद पवार गटात इंदापूरात होईल. सांगलीपेक्षा मोठा उद्रेक येथे होईल, असा इशाराही माने यांनी दिला.

भरत शहा यांनीही दिला इशारा
शरद पवार गटाचे नेते भरत शहा यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आजचा मेळावा जनतेचा विचार समजून घेण्यासाठी होता. आमच्यात मतभेद नाहीत. आमच्यात दोनच उमेदवार आहेत. या दोघांपैकी कोण उभं राहणार याचा निर्णय लवकरच जाहीर होईल. आम्ही सगळे एकच आहोत. पक्ष चालवताना काही निर्णय नाईलाजाने घ्यावे लागतात, पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी जनतेचा कौल पाहीला तर ते त्यांचा निर्णय बदलू शकतात. आम्हाला परिवर्तन पाहिजे. दिलेल्या उमेदवाराचं काम आम्ही करणार नाही, असा थेट इशारा शहा यांनी दिला.
अपक्ष लढण्याची बंडखोर गटाची तयारी
प्रवीण माने यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले, "इंदापुरात आज ऐतिहासिक सभा झाली. याआधी एवढी मोठी सभा झाली नाही. जनतेचा प्रचंड प्रतिसाद होता. लोकसभा निवडणुकीतही आम्हाला असाच प्रतिसाद मिळाला होता. आज लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. आम्ही जनतेला आव्हाना केल्यानंतर तीन दिवसांत एवढी जनता जमली. यावरुन जनतेने कौल समजतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवार आम्हाला कालही दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पण निर्णय बदलला नाही, तर अपक्ष ही आमची भूमिका राहील" असा थेट इशारा प्रवीण माने यांनी दिला.












Click it and Unblock the Notifications