ईव्हीएमचा वाद तापणार..! शरद पवारांची दिल्लीत बैठक, आमदार राजीनामा देणार..?
महायुतीच्या एवढ्या मोठ्या विजयावर विरोधकांना अजूनही शंकाच आहे. ईव्हीएमवर अनेकांनी आरोप केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथील आंदोलन सर्वच विरोधकांनी उचलून धरले आहे. आता याच विषयात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काल शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पराभूत उमेदवारांची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यावर चर्चा झाल्याचे समजते. आज किंवा उद्या ही याचिका दाखल होईल, असेही काहींचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे आज सायंकाळी अरविंद केजरीवाल, अभिषेक मनू सिंघवी, हेही शरद पवारांसोबत याच विषयावर चर्चा करणार आहेत.

शरद पवारांच्या घरी बैठकांचा जोर
विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांनी काल शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक घेतली. शरद पवारांनी त्यात पुढची दिशा सांगितली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे उमेदवार संदीप वर्पे, खडकवासल्याचे उमेदवार सचिन दोडके, शिवाजीनगरचे उमेदवार दत्ता बहिरट, काँन्टोन्मेंट बोर्डाचे उमेदवार रमेश बागवे आदींसह माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत सुप्रीम कोर्टात आज किंवा उद्या याचिका दाखल करण्याचे ठरल्याचे समजते.
अरविंद केजरीवालही घेणार बैठक
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल हेही बैठक घेणार आहेत. अभिषेक मनू सिंघवी हेही यावेळी उपस्थित असतील. मतदार यादीतील घोळ, वाढलेली मते, ईव्हीएमबाबत संशय आणि इतर अनेक बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे. कायदेशिर लढाईसाठी काय करायला हवे, हेही यात ठरणार असल्याचे समजते. ईव्हीएमविरोधात आता सर्वच विरोधक एकत्र येत लढा देणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले.
आमदारांची राजीनाम्याची तयारी
माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर हे विजयी झाले आहेत. मात्र त्यांनाही मतांच्या फरकावर संशय आहे. आपल्याला कमीत कमी एक लाख मतांचे लीड हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. पराभूत आमदारांच्या बैठकीस तेही उपस्थित होते. प्रसंगी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊ, पण ईव्हीएम विरोधात लढाई करु, असे त्यांनी एका मिडिया हाऊसशी बोलताना सांगितले. शरद पवार गटाचे इतर आमदारही या विरोधात एकवटून तेही राजीनामा देतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications