'त्या' दोन अटी अमान्य? शरद पवारांना नकोय केंद्राची झेड प्लस सुरक्षा
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा दिली. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर पवारांची वाय दर्जाची सुरक्षा वाढवून झेड प्लस सुरक्षा देण्याची तयारी केली. मात्र गृहमंत्रालयाच्या या निर्णयानंतर खुद्द शरद पवारांनी यावर संशय व्यक्त केला होता.
आज शुक्रवारी शरद पवारांच्या झेड प्लस सुरक्षेप्रकरणी दिल्लीतील घरी बैठक झाली. या बैठकीत शरद पवारांनी ही सुरक्षा अंशतः नाकारल्याची माहिती आहे. झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेतील दोन अटींना शरद पवारांनी नकार दिल्याच्या चर्चा आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितले हे कारण
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी झेड प्लस सुरक्षेबाबत आज महत्त्वाची बैठक झाली. सीआरपीएफचे महासंचालक कमलेश सिंह, गृहमंत्रालयाचे अधिकारी, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, अग्निशमन दल, इंटेलिनजन्स ब्युरोचे प्रतिनिधी बैठकीला हजर होते. त्यांच्याकडून शरद पवारांना सविस्तर माहिती देण्यात आली. पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय का घेण्यात आला? अशा अनेक गोष्टींबाबत शरद पवारांना थेट माहिती देण्यात आली.
बैठकीबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या अटी- शर्थीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर होणार आहे. शरद पवारांना सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती थेट शरद पवारांना देण्यात आली, दुसऱ्या कुणालाही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. सुरक्षेचं खरं कारण काय आहे, याबाबतची माहिती फक्त शरद पवारांना देण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं सुरक्षा वाढवण्याचं कारण गुप्त ठेवण्यात आलं. शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शरद पवारांसोबत 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्ट मध्ये असणार आहेत. त्यासोबतच सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी, असा आग्रह शरद पवारांना करण्यात आला आहे. परंतु, शरद पवारांना यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती सुत्रांच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच, घराच्या आतमध्ये सुरक्षाकडं नसावं, अशी सूचना शरद पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवारांच्या सुरक्षेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. अहवाल सादर झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications