मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला दिला 'हा' शब्द
शरद पवार आज परभणी व बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला त्यांनी मस्साजोगला जाऊन मृत संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर ते परभणीला आले. तेथे त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतली. शरद पवारांना पाहून सोमनाथच्या आईने डाहो फोडला. सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ, असा शब्द शरद पवारांनी यावेळी दिला.

आईने मांडले गाऱ्हाणे
परभणी भेटीत पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन केलं. त्यावेळी सोमनाथची आई धाय मोकलून रडली. ती म्हणाली, 'माझा मुलगा आंदोलनात नव्हता. त्याची कोणतीही चूक नसताना पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी मारहाण करुन त्याचा जीव घेतला. सोमनाथला कोणताही आजार नव्हता. माझ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मारेकऱ्यांना फाशी द्या,'
फडणवीसांची चुकीची माहिती
या भेटीत पवारांसमोर सूर्यवंशी कुटुंबाने अनेक धक्कादायक तक्रारी केल्या. विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परभणी प्रकरणात चुकीची माहिती दिल्याचा दावा सोमनाथच्या कुटुंबियांनी केला. 'माझ्या भावावर अन्याय झाला आहे. त्याचा फोन अद्याप पोलिसांकडे आहे. त्याचा डेटा डिलीट केला जाऊ शकतो,' असा संशय सोमनाथच्या भावानं व्यक्त केला. यावेळी सोमनाथच्या कुटुंबियांनी त्याच्या समाजकार्याची माहिती देणारी कागदपत्रं पवारांना दाखवली.
काय म्हणाले शरद पवार
सूर्यवंशी कुटुंबियांशी बोलताना शरद पवार म्हणाले, 'घरातील कर्त्या मुलाचं निधन होणं खूप धक्कादायक आहे. मुलगा गमावण्याचं दु:ख मोठं आहे. ते दु:ख सोसणं सोपं नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू. तुम्हाला न्याय मिळवून देऊ. परभणीत झालेल्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले होते. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कॉम्बिंग ऑपरेशन करुन ताब्यात घेणं चूक आहे. झालेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. पोलिसी अत्याचारामुळे मुलगा आपल्यातून गेला ही बाब अतिशय दु:खद आहे,' अशा शब्दांत पवारांनी सोमनाथच्या कुटुंबाचं सांत्वन केलं.












Click it and Unblock the Notifications