शरद पवारांनी घेतली डॉ. बाबा आढाव यांची भेट; आत्मक्लेष आंदोलनावर झाली चर्चा, आता...
Sharad Pawar- Baba Adhaav's meeting- पुण्यातील फुले वाड्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषण करत आहेत. गेल्या तीन दिवासांपासून त्याचे राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ उपोषण सुरु आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तेथे जात बाबा आढाव यांची भेट घेतली. तत्पूर्वी शरद पवारांनी या वाड्यातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

बाबा आढाव यांचे आत्मक्लेष आंदोलन
गेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला आहे. लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीत दिसलेली मानसिकता लगेच तीन महिन्यांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत कशी बदलली, असा त्यांचा प्रश्न आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी बदलत गेल्याचेही दिसले. ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला असल्याचा आरोप करत त्यांनी गेल्या तीन दिवसांपासून फुले वाड्यात आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. गौतम अदानी प्रकरणात लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याने मी सरकार विरोधात सत्याग्रह आंदोलनही करणार असल्याचं बाबा आढाव यांचं म्हणणं आहे.
शरद पवारांनी घेतली भेट
बाबा आढाव हे फुले वाड्यात आंदोलनाला बसल्यानंतर रोहित पवार, छगन भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती. आता ज्येष्ठ नेते शरद पवारही त्यांच्या भेटीला आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे, म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं होय, असं मत बाबा आढाव यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केलं. तसंच ईव्हीएमवर शंका घ्यायला जागा आहे, असंही बाबा आढाव शरद पवारांना बोलल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय इतर मुद्यांवरही या भेटीत शरद पवारांनी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.
उपोषणाचा तिसरा दिवस
डॉ. बाबा आढाव हे सध्या 95 वर्षांचे आहेत. महात्मा फुले पुण्यतिथीचे औचित्य साधत त्यांनी फुले वाड्यात आत्मक्लेष आंदोलन सुरु केले. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सध्या राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा केली जात असल्याचं त्यांचे म्हणणं आहे. त्याचाच निषेध करण्यासाठी बाबा आढाव हे आंदोलन करत आहेत. आता शरद पवार यांच्या भेटीनंतर या आंदोलनाची चांगलीच चर्चा गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications