एकत्र येणार? शरद पवार- अजित पवारांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा; वाचा नेमकं काय झालं
राष्ट्रवादीत फूट पडली असली तरी, शरद पवार व अजित पवार या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं, असं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेहमी वाटतं. या काका-पुतण्यांभोवतीच राष्ट्रवादीचं सगळं राजकारण फिरतं. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमधले संबंध सुधारत असल्याचं दिसत आहे. त्यातच आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या सर्वसाधारण सभेनंतर अजित पवार व शरद पवारांमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकारणात चर्चा वाढली आहे.

नेमके काय झाले?
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा होती. याच कार्यक्रमानिमित्त शरद पवार व अजित पवार हे एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांच्या खुर्चा शेजारी-शेजारी असल्या तरी अजित पवार शरद पवारांपासून एक खुर्ची सोडून बसले. या दोन्ही नेत्यांच्या मध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले होते. अजित पवारांनी खुर्ची बदलल्याची ही चर्चा सुरुवातीला रंगली. मात्र बाबासाहेब पाटील यांना शरद पवारांशी बोलायचं होतं म्हणून मी खुर्ची बदलली, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी नंतर दिलं.
दोन्ही नेते एकत्र
या बैठकीनंतर मात्र अजित पवार यांनी थेट शरद पवारांच्या दालनात जाऊन बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा केली. हा व्हिडीओही प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडीओत अजित पवार घाईघाईने शरद पवार यांच्या दालनात घुसताना दिसत आहेत. सुरुवातीला अजित पवार हे शरद पवारांच्या पीएला कुठं बसायचं रे..? असा प्रश्न विचारतात. त्यानंतर पीए त्यांना साहेब आत बसलेत, असं उत्तर देतो. त्यानंतर अजित पवार थेट प्रीसेडेंट लिहलेल्या कॅबिनमध्ये जातात आणि दार लावून घेतात, असं सगळं या व्हिडीओत स्पष्ट दिसतंय.
काय झाली चर्चा
अजित पवार थेट कॅबिनमध्ये गेल्यावर बंद दाराआड या दोघांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. आता ही चर्चा नेमकी काय हे समजले नाही. मात्र अजित पवारांना कॅबिनमधून बाहेर आल्यावर पत्रकारांनी काय चर्चा झाली, असं विचारलं. त्यावर अजितदादा म्हणाले, . या व्यवसाया (शुगर) करता जे महत्वाचे प्रश्न आहेत, त्याविषयी साहेबांशी बोलणं झालं. सहकार खातं, एक्साईज खातं, कृषी खातं आणि ऊर्जा खातं या चौघांचा या उद्योगाशी थेट संबंध येतो, त्याविषयीच मी बोललो असं अजित पवारांनी सांगितलं.
एकत्र येण्याच्या चर्चा
अजित पवारांनी जरी सहकार खात्याविषयी आमच्यात बोलणं झाल्याचं सांगितलं असलं तरी, या दोघांचे मधूर संबंध पाहता एकत्र येण्याविषयी काहीतरी चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार व शरद पवार आगामी काळात एकत्र येतील, असंही बोललं जात आहे. यापूर्वी बारामतीतील एका कार्यक्रमात सुप्रीया सुळे व सुनेत्रा पवार शेजारी-शेजारी बसून बोलल्या होत्या. कुटुंबातील अनेक सदस्यही या दोघांच्या एकत्र येण्यावर चर्चा करताना दिसत आहेत. त्यामुळे आजची पुण्यातील भेट नेमकी कशासाठी, हा प्रश्न चर्चेत आला आहे.












Click it and Unblock the Notifications