पालकमंत्रिपदाचेही ठरले..!'या' दिवशी होणार यादी जाहीर; देसाईंनी थेट सांगूनच टाकले
रखडलेला शपथविधी, मंत्रीमंडळास झालेला उशीर आणि त्यानंतर जाहीर झालेले खातेवाटप... या सगळ्यांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वीच रात्री उशीरा खातेवाटप करण्यात आले. आता पालकमंत्रीपदाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महायुतीतील दिग्गजांची रस्सीखेंच पाहता, पालकमंत्र्यांच्या नियुक्तीसही उशीर होणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होणार, याबाबत शिवसेना नेते व पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी थेट तारीखच सांगून टाकलीय.

काय म्हणाले देसाई
महायुतीत रस्सीखेंच सुरु आहे का, असा प्रश्न देसाई यांना विचारण्यात आला होता. त्यावर देसाई म्हणाले, महायुतीच्या तिन्ही पक्षांत मंत्रिपदावरुन कोणतीही रस्सीखेंच नाही. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी ठरवून मंत्रिमंडळ तयार केले आहे. यापुढेही आमच्या तिन्ही पक्षात सर्व मिळून निर्णय होणार आहेत. शिवसेनेचे सगळे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते.
पालकमंत्रीपदाबाबत दिले संकेत
पालकमंत्रीपदाबाबतही उशीर होईल का, असा प्रश्न देसाई यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "पालकमंत्री पदाचे अधिकृत नावाचा अंतिम निर्णय महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहेत. खातेवाटप होईपर्यत चार दिवस, याला हे खाते मिळणार, त्याला ते खाते मिळणार, अशा बातम्या सुरू होत्या. पण खातेवाटप करताना समतोल राखण्यात आला. त्यामुळे जरा धीर धरा, येत्या दोन दिवसांत पालकमंत्रीपदाचे खातेवाटप होईल. आमच्या तीन पक्षात मंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नव्हती. तसेच पालकमंत्री पदावरून आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही", असेही शंभुराज देसाई म्हणाले.
महापालिकेवर महायुतीचाच झेंडा
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबद्दल देसाई यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत फूट पडली. शिवसेना ठाकरे गट इतक्या बॅकफूटवर गेला, की तो अपयशाचे खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडत आहे. काँग्रेस म्हणतं काय करायचं ते करू द्या. राष्ट्रवादी म्हणतेय, आम्ही देखील वेगळे लढू. त्यांचं कुणाचंच कुणाला, कळत नाहीए. मात्र महायुती अखंड आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकेल. तिघांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकलेला दिसेल, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.


Click it and Unblock the Notifications
