आदिवासींचा नेता हरपला, मधुकरराव पिचड यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन
गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु असणारे भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे आज निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. आजारपणासोबत सुरु असलेली त्यांची झुंज आज संपली. त्यांच्या निधनाबाबत भाजपसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले.

सात वेळा होते आमदार
मधुकर पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्रदेखील काम केलं होतं.
अनेक वर्षे होते मंत्री
मधुकर पिचड यांच्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषद सदस्य म्हणून झाली होती. त्यानंतर ते अनेक खात्यांचे मंत्री राहिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास खात्याची जबाबदारी प्रदीर्घ काळ राहिली. त्यांनी अकोले तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता अथक प्रयत्न केले. ते आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा यासाठी देखील नेहमी प्रयत्नशील राहिले. अकोले तालुक्यात अनेक छोट्या धरणांची निर्मीती मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात झाली. त्यांनी भंडारदरा धरणाला आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी अनेकदा जन आंदोलन केले होते.
माझे जुने सहकारी मधुकरराव पिचड यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन मधुकर पिचड यांना भावपूर्ण…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 6, 2024
शरद पवारांसोबत होते स्नेहाचे संबंध
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी स्थापनेनंतर मधुकर पिचड कॉंग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले. 1999 साली ते पाचव्यांदा राष्ट्रावादीच्या तिकीटावर आमदार झाले. 2004 साली सहाव्यांदा तर 2009 मध्ये ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. मधुकर पिचड यांनी अनेक वर्ष आदिवासी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे पुत्र वैभव पिचड हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेले आणि मधुकर पिचड राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले.












Click it and Unblock the Notifications