आता थोरात विरुद्ध खताळ नव्हे तर खताळ वि.तांबे, संगमनेरमध्ये वादाचे नवे पर्व; वरचढ कोण ठरणार?
संग्राम महाराज भंडारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर येथे आयोजित 'सद्भावना शांती मोर्चा'मध्ये अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या मोर्चात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सत्यजित तांबे सहभागी झाले होते. यावेळी, 'मी देखील विरोधी आमदार नाही' असे वक्तव्य करून तांबेंनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.

तांबे यांच्या वक्तव्याचा अर्थ काय?
सत्यजित तांबे यांनी त्यांच्या भाषणात, "तुम्ही (विद्यमान आमदार) सत्ताधारी आमदार असला, तर मी देखील विरोधी आमदार नाही" असे म्हटले. या वक्तव्याचा रोख विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्याकडे होता. तांबे यांनी स्पष्ट केले की, हा मोर्चा केवळ काँग्रेसचा नसून, बाळासाहेब थोरात यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा आहे. त्यांनी संगमनेरच्या जनतेला उद्देशून सांगितले की, "आमचा पराभव झाला हे मी मान्य करतो, पण जनता चुकलेली नाही, आमचीच कुठेतरी चूक झाली आहे."
'मामा-भाचे राजकारण करतायत', शिवसेना आमदाराचा पलटवार
सत्यजित तांबे यांच्या या वक्तव्यावर शिवसेना आमदार अमोल खताळ यांनी जोरदार टीका केली. खताळ म्हणाले, "तुम्ही स्वतःला सत्ताधारी समजत असाल, तर तुम्हाला शुभेच्छा." ते पुढे म्हणाले की, "हे वक्तव्य करण्याची तुम्हाला गरज का भासली, हे संगमनेरच्या जनतेने समजून घ्यावे." लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तांबे यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काम केल्याचे खताळ यांनी सांगितले. पराभव झाल्यामुळे मामा-भाचे (बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे) राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
'सत्यजित सर्वांचाच आहे,' बाळासाहेब थोरातांनी केले समर्थन
या प्रकरणी बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांचे समर्थन केले आहे. "सत्यजित तांबे हा स्वतंत्र आहे. डॉ. सुधीर तांबे यांना जशी सर्व पक्षांनी मदत केली, त्याचप्रमाणे सत्यजितला देखील सर्वच पक्षाच्या लोकांनी मत दिली आहेत. त्यामुळे तो सर्वांचाच आहे," असे थोरातांनी स्पष्ट केले.
या सर्व घडामोडींमुळे संगमनेरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. तांबे आणि थोरात यांच्या विधानांमुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications