Video : साताऱ्यात माणुसकीला काळीमा; रिक्षाचालकाने महिला पोलिसाला नेले फरफटत, भयानक थरार!
Satara crime News : सातारा शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दारुड्या रिक्षाचालकाने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला सुमारे दोनशे मीटरपर्यंत फरफटत नेले. या घटनेत महिला पोलीस गंभीर जखमी झाली असून ती रक्तबंबाळ झाली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना साताऱ्यातील खंडोबा माळ ते मार्केट यार्ड परिसरात घडली. दारूच्या नशेत असलेल्या एका रिक्षाचालकाला वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना महिला पोलीस कॉन्स्टेबलने अडवण्याचा प्रयत्न केला. पण, थांबण्याऐवजी त्या रिक्षाचालकाने रिक्षा पुढे काढली आणि महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेले. सुमारे १०० ते २०० मीटरपर्यंत रिक्षाचालक तिला फरफटत घेऊन गेला. या दरम्यान, महिला पोलीस रिक्षाला अडकली आणि फरफटत गेल्याने ती गंभीर जखमी झाली.

नागरिकांनी रिक्षाचालकाला चोपला
या रिक्षाचालकाने केवळ महिला पोलिसालाच फरफटत नेले नाही, तर रस्त्यावरील तीन ते चार गाड्यांनाही धडक दिली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील काही जागरूक नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अखेर, नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडले आणि त्याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
साताऱ्यात रिक्षाचालकाने महिला पोलिसाला नेले फरफटत, नेमका कसा घडला थरार! पाहा व्हिडिओ
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) August 18, 2025
#SataraCrime pic.twitter.com/ZZS1am4fAD
पोलीस कॉन्स्टेबलवर उपचार सुरू
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. कर्तव्य बजावत असताना एका महिला पोलिसावर झालेला हा हल्ला, तसेच नागरिकांनी दाखवलेली तत्परता यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेने दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर आणि सार्वजनिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.












Click it and Unblock the Notifications