प्रमोद महाजन देश कसे सांभाळू शकले असते?, सारंगी महाजनांचे प्रकाश महाजनांना प्रत्युत्तर, वाचा सविस्तर
Sarangi Mahajan on Prakash Mahajan : भाजपचे दिवंगत नेते प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी पुन्हा एकदा महाजन आणि मुंडे कुटुंबातील अंतर्गत वादावर थेट भाष्य केले आहे. त्या एका वृत्तवाहिणीशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी दीर प्रकाश महाजन यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले, तसेच प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वासंदर्भात आणि पंकजा मुंडे यांच्या राजकीय कार्यशैलीवर महत्त्वाचे विधान केले.
'प्रमोद महाजन देश काय सांभाळणार?'
सारंगी महाजन यांनी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. प्रमोद महाजन हे जिवंत असते तर देशाचे पंतप्रधान झाले असते, या विचारावर त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. अनेकजण म्हणतात, आज प्रमोद महाजन असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते. पण माझा सवाल हा आहे की, आमच्या घरातलं त्यांना निस्तरता आले नाही, ते घराला सावरु शकले नाहीत, ते देशाला कसे सांभाळू शकले असते?"
महाजन परिवारातील लढाई ही मानपमानाची आणि आर्थिक विभागाणीची होती, जिथे 'पैसेवाले आणि पैसे नसणारे' अशी विभागणी झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. केस लढवण्यासाठी आलेल्या पैशांवर प्रकाश महाजन यांनी प्रश्न विचारल्यावर, "तो पैसा तुमच्या घरातील नव्हता, तो माझ्या माहेरून आला होता," असे त्यांनी स्पष्ट केले.

ब्लॅकमेलिंगचा आरोप खोटा; मुंडेंच्या घरावर संशय
प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल केले आणि पैशांच्या हव्यासातून ही हत्या झाली, या प्रकाश महाजन यांच्या आरोपाला सारंगी महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल करत असतो तर आज आम्ही सी-फेसला बंगला घेऊन राहिलो असतो. यामुळे हत्येमागे पैशांचा हव्यास नव्हता, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये प्रचंड प्रेम होते. माझे पती प्रमोद महाजन यांच्याकडे हक्काने हवे ते मागू शकत होते आणि प्रमोद महाजनही मागितलेल्या गोष्टी देत होते.
प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर संशय
प्रकाश महाजन छत्रपती संभाजीनगरात राहतात. ते करत असलेली टीका ही त्यांची नाही. "हे त्यांना कोणीतरी सांगितलं आहे. कदाचित मुंडेंच्या घरातून त्यांना असे बोलण्यासाठी सांगितले आहे," असा गंभीर संशय सारंगी महाजन यांनी व्यक्त केला.
पंकजा मुंडेंवरील वक्तव्यावर सारंगी महाजनांचे स्पष्टीकरण!
सारंगी महाजन यांनी यापूर्वी पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या 'बिघडलेली मुलगी' या वक्तव्यावर टीका झाल्यावर स्पष्टीकरण दिले. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात न्यायालयात साक्ष दिली, म्हणून आपण त्यांच्या मुलीवर आरोप करत आहोत, हा आरोप त्यांनी फेटाळला. मी गोपीनाथ मुंडे यांची बदनामी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे त्यांनी नमूद केले.
पंकजा मुंडे या व्यक्तिशः चांगल्या आणि कोमल मनाच्या असू शकतात, पण ती राजकारणात बिघडलेली आहे. लोकांच्या नजरेत ते दिसते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे सर्व वक्तव्य हे न्यायालयीन खटल्याशी संबंधित नसून वारसा हक्काच्या सामाजिक मुद्द्याला धरून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सारंगी महाजन यांनी या सगळ्या प्रकरणावर सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे जास्त बोलता येणार नाही, असे सांगत लवकरच या सर्व प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याचे संकेत दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications