बहिण भावाने आमची जमीन हडपली! प्रविण महाजन यांच्या पत्नीचे धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप!
Sarangi Mahajan accuses Dhananjay Munde and Pankaja Munde : दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. दोघा भावंडांनी संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून आपली कोट्यवधी रुपयांची जमीन अल्प किमतीत बळजबरू खरेदी केली, असा खळबळजनक आरोप केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत.
प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जबरदस्तीने घेतली असल्याच त्यांनी म्हटले आहे.

राजकी वर्तुळात खळबळ
सारंगी महाजन या प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत. मुंडे आणि महाजन कुटुंबाचे आपसात नातेही आहे. आज सारंगी महाजन यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन?
"परळीत माझी 63.50 आर जमीन होती, 36 आर जमीन फ्रॉड करुन विकली. मला परळीच्या एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसला नेले. तिकडे माझ्याकडून सही करुन घेण्यात आली. कोणी जमीन घेतली, हे आम्हाला माहिती नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेले, जेवू घातले. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या." असा सारंगी महाजन यांनी आरोप केला आहे.
'मी विरोध केला पण..'
सारंगी महाजन म्हणाल्या, "माझ्या सह्या घेताना मी त्यांना विरोध केला असता त्यांनी म्हटले की, सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडून देणार नाहीत" अशी धमकी दिल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. "गोविंद बालाजी मुंडे यांनी आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून त्यांनी एक लाख रुपये घेतले." असेही सारंगी महाजन यांनी आरोपात म्हटले आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आरोप
धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात आहेत. शरद पवारांना सोडून ते अजित पवारांच्या गटात सामिल झाले आहेत. यानंतर त्यांच्यावर आज गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केले आहे. हे आरोप गंभीर असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आले आहेत. धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत आणि याच मतदारसंघातील मौजे जिरेवाडी येथे ही जमीन आहे. त्यामुळे मतदारसंघात आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. केवळ धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आले आहे.
सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन यांनी 22 एप्रिल 2006 रोजी भाजपचे लोकप्रिय नेते प्रमोद महाजन यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांचे बंधू होते. यानंतर प्रवीण महाजन यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते.












Click it and Unblock the Notifications