संतोष देशमुखांचा भाऊ उद्या मोबाईल टाँवरवर चढून करणार आंदोलन; वाचा नेमकं काय आहे कारण...
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरही मोक्का लावावा आणि त्यालाही ३०२ चा आरोपी करावे, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. आपल्यालाही आता धमक्यांचे सत्र सुरु झाल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला. उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत वाल्मिक कराडला मोक्का लावावा. तसे झाले नाही तर, या आरोपींच्या हाताने मरण्यापेक्षा मी स्वतः उद्या मोबाईल टाँवरवर चढून आत्महत्या करतो, असा इशारा धनंजय देशमुख याने दिला आहे. देशमुख यांच्या या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

अख्खे कुटुंब करणार आंदोलन
उद्या मस्साजोगचे ग्रामस्थ व संपूर्ण देशमुख कुटुंब आंदोलन करणार आहे. मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टाँवरवर चढून आत्महत्या करण्याचा इशाराही दिला आहे. जोपर्यंत वाल्मिक कराडला मोक्का लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार असल्याचं मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही सांगितलं. आज याच विषयावर मस्साजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठक झाली. याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आरोपी मलाही मारतील
यावेळी बोलताना धनंजय देशमुख यांनी आपल्या मनातील भिती व्यक्त केली. ते म्हणाले, वाल्मिक कराडलाही मोक्का लागावा. उद्या हे आरोपी सुटले तर ते मलाही माझ्या भावाप्रमाणे मारुन टाकतील. मग असं मरण्यापेक्षा मी उद्या मोबाईल टाँवरवर चढून स्वतः जीव दिलेला बरा राहील. उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लागला नाही तर मी मोबाईल टाँवरवर चढणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
पोलिस माहिती देत नाही
धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात मोठा आरोप केला. ते म्हणाले, हे प्रकरण सीआयडीकडे आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांचा तपास सुरु आहे. मात्र हा तपास काय सुरु आहे याची माहिती मला मिळावी, अशी विनंती मी थेट मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती. मात्र आज हत्या होऊन ३५ दिवस झाले तरी मला माहिती देण्यात आली नाही. सीडीआर निघालेत का, पुरावे नष्ट केलेत का, असं सीआयडीने मला काहीच सांगितलं नाही. असंच चालत राहिलं तर आम्ही आंदोलन करुन काय उपयोग, अशी खंतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थही आक्रमक
मस्साजोग ग्रामस्थ 13 जानेवारीला टॉवरवरुन चढून आंदोलन करणार आहेत. त्यानंतर 14 जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांतीला ते सामुहिक आत्मदहन करणार आहेत. मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर अंगावर पेट्रोल ओतून ग्रामस्थ स्वतःला जाळून घेतील, असा इशारा देण्यात आला आहे. वाल्मीक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून मक्का लावावा, फरार आरोपी कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करावी, सरकारी वकील म्हणून वकील उज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटी कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तपासाची माहीती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी आणि केजचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करावे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications