'मंत्री संजय शिरसाटांचा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार'; या नेत्याने केला आरोप, नेमकं प्रकरण काय?
sanjay shirsat 5000 crore land scam Rohit pawar : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात मंत्री संजय शिरसाट आणि वाद हे एक समीकरण बनले आहे. त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची मालिका सुरूच असून, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर 5 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. सिडकोचे अध्यक्ष असताना त्यांनी नियम धाब्यावर बसवून एका खासगी कुटुंबाला कोट्यवधी रुपयांची जमीन दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.
मराठा साम्राज्याशी 'गद्दारी' करणाऱ्यांना भूखंड
रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, मराठा साम्राज्याविरुद्ध ब्रिटिशांना मदत करणाऱ्या 'बिवलकर' कुटुंबाला ब्रिटिश सरकारने सुमारे ४ हजार एकर जमीन दिली होती. स्वातंत्र्यानंतर, विविध कायदे आणि नियमांनुसार ही जमीन सरकारजमा करण्यात आली होती.
बिवलकर कुटुंबाने अनेकदा ही जमीन परत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रत्येक वेळी नकार मिळाला. मात्र, जेव्हा संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांनी सर्व नियम बाजूला सारत आपल्या पहिल्याच बैठकीत या कुटुंबाला नवी मुंबईतील सुमारे १५ एकर जमीन देण्याचा निर्णय घेतला. या जमिनीची सध्याची बाजारपेठ किंमत सुमारे ५ हजार कोटी रुपये असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

गरीबांच्या हक्कावर गदा आणि भूमिपुत्रांशी 'गद्दारी'
रोहित पवार यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, जर ही जमीन बिवलकर कुटुंबाला दिली नसती, तर सिडकोला त्यावर 10 हजार घरे बांधता आली असती आणि ती गरीबांना देता आली असती.
एकीकडे, पाच हजारपेक्षा जास्त स्थानिक भूमिपुत्र जमिनीच्या हक्कासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत, पण त्यांना जमीन मिळत नाही.
दुसरीकडे, मराठा साम्राज्याविरुद्ध काम करणाऱ्या कुटुंबाला इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन देणे ही एकप्रकारे भूमिपुत्रांशी 'गद्दारी' आहे, असा थेट आरोप रोहित पवारांनी केला. त्यांनी सरकारकडे तात्काळ शिरसाटांचा राजीनामा घेण्याची आणि बिवलकर कुटुंबाला दिलेली ही जमीन परत घेण्याची मागणी केली आहे.
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद | 🗓️18-08-2025 https://t.co/uhnIkIn1Tb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 18, 2025
वादांची मालिका सुरूच
संजय शिरसाट यांचा वादग्रस्त घटनांशी संबंध जुना आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते पैशांनी भरलेल्या बॅगसोबत दिसत होते. या घटनेनंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. याशिवाय, त्यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलच्या लिलावात सहभाग घेतला होता, ज्यात बाजारभावापेक्षा कमी किमतीत व्यवहार झाल्याचा आरोप झाला होता.
या सर्व आरोपांमुळे त्यांची प्रतिमा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रोहित पवार यांनी आता या नवीन प्रकरणाची ३६१ कागदपत्रे ट्विटरवर शेअर करून, या आरोपांना आणखी बळकटी दिली आहे. या आरोपांवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.












Click it and Unblock the Notifications