न्यू इंडिया बँकेतील घोटाळा भाजप व RSS संबंधीतांचा... 'या' मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत झालेल्या भ्रष्ट्राचारात भाजप व आरएसएसशी संबंधित लोक आहेत. येथे सर्व बिल्डर आहेत. नेता, जैन आणि भाजपचे कदमही आहेत. ज्यांना पैसे मिळाले आहेत, ते सर्व बिल्डर आरएसएस व भाजपशी संबंधित आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले राऊत?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींचा अपहार झाला. सामान्य ठेवीदारांचे पैसे त्यामुळे अडकले. पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन व महाव्यवस्थापक हितेश मेहता या दोघांना अटक केली. मात्र या संपूर्ण प्रकरणात भाजप व आरएसएशी संबंधित आरोपी आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. संजय राऊत म्हणाले, "मुंबईत न्यू इंडिया बँक ज्याप्रकारे लुटली गेली त्यात सर्व भाजपाचे लोक आहेत. या बँकेत जनतेचा पैसा आहे. पण येथे सर्व बिल्डर आहेत, नेता, जैन आणि भाजपाचे कदम आहेत. आता कुठे गेले मुलुंडचे पोपटलाल? शेकडो कोटींना बँक लुटली गेली. आता का बोलत नाहीत? भाजपाच्या लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
फडणवीसांना केला सवाल
संजय राऊत म्हणाले, "जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली ही बँक आहे. आता ते किरीट सोमय्या ईडीकडे जाणार नाहीत. पत्रकार परिषद आता का घेत नाहीत? भाजपाचे आमदार त्यात अडकले आहेत. भाजपा आमदाराच्या दबावाखाली कर्जे वाटली गेली. भाजपाच्या गृहमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी यावर उत्तर दिलं पाहिजे. काय गुन्हे दाखल करत आहात तुम्ही? ज्यांना पैसे मिळाले आहेत ते सर्व सर्व बिल्डर भाजपाशी, आरएसएस संबंधित आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या देशात विरोधी पक्षातील लोकांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना एक न्याय आहे, कोणता समान नागरी कायदा आणताय तुम्ही?", असा प्रश्नही त्यांनी विचारला.












Click it and Unblock the Notifications