राज -उद्धव ठाकरेंच्या युतीत संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ!; मनसेतून नाराजी केला रुग्णालयातून मेसेस
Sanjay Raut's MVA Claim on Raj Thackeray Sparks MNS Anger : राजकारणात 'टायमिंग'ला महत्व आहे पण तेच टायमिंग जर चुकीच्या वेळी आलं तर त्यातून फलीत काही होत नाही उलट होणाऱ्या कामात अडचणी येतात अगदी अशीच काहीशी गोष्ट आज १३ ऑक्टोबरला संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर घडली. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच संजय राऊत रुग्णालयात दाखल झाले त्यानंतर राऊतांच्या वक्तव्यावरुन मनसेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत ती थेट सर्वेसर्वा राज ठाकरेंकडे बोलून दाखवल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच प्रश्नाची चर्चा आहे. मनसे महाविकास आघाडीत (MVA) येणार का? या प्रश्नाभोवती फिरणाऱ्या नाट्यमय घडामोडींना आज आणखी एक धक्कादायक वळण मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, "राज ठाकरे यांना काँग्रेस सोबत हवी आहे," असे विधान केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला.

राऊतांच्या या वक्तव्यामुळे मनसेच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आणि नेत्यांनी थेट राज ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. यानंतर, 'महाविकास आघाडीच्या दारात कोण उभे आहे?' असा प्रश्न विचारला जात असतानाच, रुग्णालयात असलेल्या राऊतांनी लगेच 'मेसेज'द्वारे सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त झी न्यूज मराठीने दिले आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले संजय राऊत?
राज ठाकरे यांच्या संभाव्य 'मविआ' प्रवेशाबद्दल विचारले असता, संजय राऊत यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, "स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचे आहे. त्यांची ही भूमिका आहे. निर्णय नाही!"
मनसेत नाराजीचा सूर; देशपांडेंकडून स्पष्टीकरण
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मनसेच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. ही नाराजी त्यांनी थेट पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केली. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही. आमच्या पक्षाची भूमिका पक्षाचे प्रमुख राज ठाकरे मांडतील," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राऊतांचा रुग्णालयातून 'मेसेज'
मनसेच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर, रुग्णालयात उपचार घेत असलेले खासदार संजय राऊत यांनी लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना संपर्क साधला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत यांनी राज ठाकरे यांना थेट मेसेज पाठवला आहे. या मेसेजमध्ये त्यांनी "मी असे काहीही बोललो नाही," असे म्हटले असून, आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
राज ठाकरे यांच्या 'मविआ' प्रवेशाच्या शक्यतेवरून राजकीय वातावरण गरम झालेले असतानाच, संजय राऊत यांच्या वक्तव्याने आणि त्यानंतर मनसेच्या नाराजीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सर्व घडामोडींवर आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications