महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये बोगस कशी? संजय राऊतांचा पीएम मोदींवर निशाणा
Sanjay Raut : शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी या योजनेवरुन नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य मग झारखंडमध्ये योजना बोगस कशी? असा सवालही उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या 'लाडली बहन' योजना बोगस असल्याचे म्हणाले होते. तेच भाषण महाराष्ट्रात ऐकवा. हे डबल स्टॅंडर्डचे लोक आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मानसिक संतुलनाबाबत आम्हाला चिंता आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना योग्य असेल तर मग झारखंडमध्ये योजना बोगस कशी? मी पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही. पण मोदींचं हे विधान आहे, असं संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदेंवर निशाणा
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात निवडणुका कधी होणार हे एकनाथ शिंदे ठरवणार नाहीत. तर निवडणूक आयोग ठरवेल, पण मोदी- शहांच्या आदेशानंतर निवडणुक आयोग निवडणुका जाहीर करेल.राज्यातील 14 प्रमुख महापलिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका तेव्हाच होतील, जेव्हा त्यांना विश्वास येईल. भाजपच्या सांगण्यानुसार निवडणुका होणार आहेत असा आरोपही संजय राऊत यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाचा पदभार घेतला आहे का? असा सवालही त्यांनी केला.
ज्या दिवशी निवडणुका होतील त्या दिवशी हे घरी जातील
राऊत म्हणाले की, जवळपास 14 महानगरपालिकेच्या निवडणुका पराभवाच्या भितीने होत नाहीत. हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. तुम्ही इथे निवडणुका घेत नाही. तीन वर्षांपासून इथे नगरसेवक नाहीत. पुणे, नाशिक, संभाजीनगरला निवडणूका नाहीत. तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. नेमके काय चालले आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या तारखेला निवडणूका होतील, त्या दिवशी हे घरी जातील, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
गद्दारी, लुटमारी, भ्रष्टाचारात त्यांचा स्ट्राइक रेट जास्त
महायुतीमध्ये स्ट्राईक रेटवरुन जागा वाटप केले जाईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावरुनही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. त्यांचा गद्दारी, लुटमारी, खोटे बोलण्यात, भ्रष्टाचार यात त्यांचा स्ट्राइक रेट जास्त आहे. कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राइक रेट आहे. अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली












Click it and Unblock the Notifications