संजय राऊंतानी पोस्ट केला राहुल गांधींचा तो फोटो, मोदींना म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या..
नवी दिल्ली: भाजप खासदार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला.
विरोधी पक्षाकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव होता. यानंतर हंगामी अध्यक्ष भर्तृहरि महताब यांनी सभागृहाचे कामकाज पुढे नेले आणि सर्वांसमोर प्रस्ताव मांडला. आवाजी मतदानाच्या आधारे त्यांनी ओम बिर्ला यांना लोकसभा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याचे निमंत्रण दिले.

यावेळी विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्यासोबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील ओम बिर्ला यांना आसनापर्यंत पोहोचण्यासाठी आले होते. काँग्रेसने काल रात्रीच राहुल यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले आहे.
राहुल गांधींची सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान, ओम बिर्ला यांना आसनापर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी गेल्यानंतर राहुल गांधी पुढे आणि मोदी त्यांच्या मागे असलेला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काँग्रेसकडून हा फोटो मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे.
काँग्रेस तसेच विरोधी आघाडी इंडियाच्या अनेक नेत्यांनी हा फोटो पोस्ट करत मोदींना टोमणे मारले आहेत. ही फक्त सुरूवात असून राहुल गांधी पुढे अजून मोठे होतील असा इशारा काँग्रेसच्या चाहत्यांनी दिला आहे.
काय आहे संजय राऊतांची पोस्ट
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी कौन राहुल म्हणत राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. त्याचीच आठवण करून देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओम बिर्ला यांनी पदभार स्वीकारल्यानंतरचा एक फोटो शेअर केला आहे.
हा हा हाहा
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2024
कौन राहुल?
ये है राहुल!
ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?@RahulGandhi @BJP4India pic.twitter.com/FFbzQditKS
हा फोटो शेअर करताना राऊतांनी म्हटले आहे की, "हा हा हा हा... कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?" असे म्हणत राऊत यांनी मोदींना डिवचले आहे.
बिर्ला यांच्या नावावर या विक्रमाची नोंद
एक लोकसभा अध्यक्ष एकापेक्षा जास्त कालावधीसाठी हे पद सांभाळेल हे पाचव्यांदा घडत आहे. काँग्रेस नेते बलराम जाखड हे एकमेव पीठासीन अधिकारी आहेत ज्यांनी सातव्या आणि आठव्या लोकसभेत दोन वेळा काम केले आहे.
काँग्रेसने मंगळवारी रात्री राहुल गांधी यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. काँग्रेसला 16 व्या लोकसभेत 44 तर 17 व्या लोकसभेत 52 खासदार मिळाले. यावेळी पक्षाचे 99 खासदार विजयी झाले आहेत.
मात्र, राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडल्यामुळे ही संख्या 98 वर आली आहे. असे असतानाही विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी ते पुरेसे आहे.












Click it and Unblock the Notifications