'खास्ट सासू' टीकेनंतर राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं म्हणाले- ते सतत हरतात अन् भाजपची स्क्रिप्ट वाचतात
Sanjay Raut criticizes Raj Thackeray over BJP support : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना डिवचलं आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर खास्ट सासू अशी टीका केली होती त्यावर संजय राऊत यांनी राज ठाकरे निवडणुकांत सतत हरत आले असून ते भाजपची स्क्रिप्ट वाचतात अशी टीका केली. ते आज माध्यमांशी बोलत होते.
खास्ट सासू संदर्भात संजय राऊतांचा पलटवार
राज ठाकरे यांच्या खास्ट सासू या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे 25 वर्ष भाजपने दिलेले स्क्रिप्ट वाचत आहेत. कधी नारायण राणेंचे तर कधी एकनाथ शिंदेंचे स्क्रिप्ट वाचतात. तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत गांभिर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी स्वतःच शिवसेना पक्ष सोडलेला आहे. त्यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या दुश्मनांना ते मदत करत आहेत. राज ठाकरेंनी त्यांनाच मदत होईल अशी भूमिका घेतल्याने त्यांना महाराष्ट्र महत्व देईल असे मला वाटत नाही.

राज ठाकरे स्वतःच्याच चष्म्यातून पाहतात
संजय राऊत म्हणाले, नारायण राणे हे उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच एकनाथ शिंदे यांना पहिल्यांदा आमदारकी मिळाली. मंत्रीपदही मिळत गेली, राज ठाकरेंना हे बहुतेक माहित नसेल. आमच्यावर अत्याचार झाले, आम्हाला कमी त्रास झाला नाही.
राज ठाकरेंचा एक चष्मा आहे आणि त्या चष्म्याच्या नजरेतून स्वतःकडेच पाहतात. राज ठाकरे सातत्याने निवडणुका लढवून हरत आहेत. आमच्याकडे पक्ष, चिन्ह नाही तरीही आम्ही लाखो मत घेऊन आम्ही नऊ खासदार निवडून आणले राज ठाकरे हे विसरत आहेत. जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे.
आमचा धर्म महाराष्ट्र धर्म
संजय राऊत म्हणाले, आमचा धर्म महाराष्ट्र धर्म आहे. या धर्माचे शत्रू गुजरातचे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यातील महायुतीचे नेते आहेत. हा महाराष्ट्र भिकेला लावण्याचे काम कुणी केले असेल तर महाराष्ट्राच्या शत्रूंने केले आहे. मिस्टर फडणवीस आधी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणा, मनापासून...वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही ही आपली भूमिका होती आणि आजही आपल्या मनात तेच पाप आहे.












Click it and Unblock the Notifications