फडणवीस अर्बन नक्षलवादाचे म्होरके; संजय राऊत यांचा गंभीर आरोप, मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
बीड, ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. उपमुख्यमंत्र्याच्या मुलाच्या मतदारसंघात रेप, हत्या होत आहेत. परळीत बंदुकीच्या जोरावर मतदानापासून रोखलं जातंय. हा अर्बन नक्षलवाद नाही तर काय आहे..? असा सवाल करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार यांनी अनेक गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अर्बन नक्षलवादाचे म्होरके आहेत असा आरोप राऊत यांनी केला.

मंत्री मुंडेवर घाणाघात
संजय राऊत म्हणाले, बीडमध्ये आत्तापर्यंत ३८ हत्या झाल्या आहेत. परळीत सुमारे ११८ मतदान केंद्रावर बंदुकीच्या धाकानं मतदान होऊ दिलं नाही. बंदुक रोखून मतदारांना रोखण्यात आलं. बीड जिल्ह्यात खुलेआम हत्या होत आहेत. या सगळ्यांचा सूत्रधार मंत्री आहे. ज्या ३८ हत्या झाल्या त्यांच्या पत्नी ३८ विधवा महिला बहिणी नाहीत का..? असा सवाल करत संजय राऊत यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा धनंजय मुंडे यांना आशीर्वाद आहे. मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांनी तो घेतला पाहिजे. मी हे हिंमतीने सांगतोय कारण मला त्याची किंमत मोजावी लागेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांवर आरोप
भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळेच बीड जिल्ह्यात अर्बन नक्षलवाद फोफावल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले, देवाभाऊ स्वतःला लाडका भाऊ म्हणतात. मग बीडमध्ये झालेल्या ३८ विधवा महिला त्यांच्या बहिणी नाहीत का..? संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशीची हत्या झाली. विरोधी पक्षाने या हत्येला वाचा फोडली नसती तर, फडणवीसांनी या हत्याही दाबल्या असत्या. परळीत खुलेआम बंदुकीतून बार उडवले जातात. हा अर्बन नक्षलवाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच या अर्बन नक्षलवादाचे म्होरके आहेत.
२९ तारखेला मोर्चा
नैतिकतेच्या आधारे तुम्हाला काही वाटत असेल तर त्या मंत्र्याला हटवा, अशी मागणी राऊत यांनी केली. ते म्हणाले, आम्ही सर्वजण २९ तारखेला न्यायासाठी मोर्चा काढणार आहोत. उद्धव ठाकरे बीड आणि परभणीत जाणार आहोत. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. महाराष्ट्राची स्थिती अशी झाली की युनायटेड नेशनची ह्युमन राईटच्या विंगला या प्रकरणात लक्ष घालायला लावली पाहिजे, इतकी भयानक परिस्थिती आहे, असे ते म्हणाले.












Click it and Unblock the Notifications