नुकसानीची पाहणी सोडून धनंजय मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त - संभाजीरांजेचा खोचक टोला
SambhajiRaje on Dhananjay Munde : शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणे सोडून राज्याचे कृषीमंत्री हल्ली सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त झाल्याची खोचक टीका स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडेंवर केली.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. दरम्यान, आज संभाजीराजे यांनी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

कृषीमंत्र्यांनी तर येथे यायलाच हवे
छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील हदगाव तालुक्यातील उंचाडा, मारलेगाव आणि धानोरा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे न करण्याची गरज नाही, असे म्हणत मदत केली जाईल, असे म्हटले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, पंचनामे झाल्यावरच मदत जाहीर केली जाईल. यावर देखील संभाजीराजे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यकर्त्यांनी येथे येऊन पाहावं. मी गाडीतून बसून पाहणी केलेली नाही. राज्यकर्त्यांना लोकांच्या बांधावर जायला वेळ नाही का, कृषीमंत्र्यांनाही वेळ अजिबात नाही का?, असा सवाल त्यांनी केला.
कृषीमंत्र्यांना हे शोभते का?
संभाजीराजे पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले की, हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला हवेत. नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे. शेतकऱ्यांची अवस्था पाहून मला वेदना झाल्या. कृषीमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषीमंत्र्यांना हे शोभते का? जरा इकडे येऊन बघा परिस्थिती काय आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊतांची धनंजय मुंडेंवर टीका
काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर केल्यावर सर्वांना जाग आली. कृषी मंत्री कोठे होते? या राज्याला कृषीमंत्री आहे की नाही?, असा हल्लाबोल केला होता.












Click it and Unblock the Notifications