Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन, मुंबई HCकडून दिलासा, वाचा- वाझेंचे नेमकं प्रकरण काय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल झालेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ते गेल्या 2 वर्षांपासून तुरुंगात होते. पण आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगली आहे.

Sachin Waze Bail Update

नेमकं काय आहे प्रकरण?

सचिन वाझे यांना मनसूख हिरेन हत्याकांड व उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील निवासस्थानालगत स्फोटकांनी भरलेली कार पार्क केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महानगरातील रेस्टॉरंट व बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातही सचिन वाझे यांचे नाव आले होते. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

सचिन वाझे यांनी नियमित जामिनासाठी काही महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने गत 23 ऑगस्ट रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज जारी करण्यात आला. त्यामुळे सचिन वाझे यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोण आहेत सचिन वाझे?

नव्वदच्या दशकातील 'एन्काऊंटर स्पेशलिस्ट' अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे.

मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.

सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर 'जिंकून हरलेली लढाई' नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.

सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.

अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकऱणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं होतं. त्यावेळी सचिन वाझे राज्यातच नव्हे तर देशात चर्चेत आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+