Rohit pawar PC 'अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे पुराव्यांसह खळबळजनक आरोप! वाचा डिटेल्स
Rohit pawar PC : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सत्ताधारी आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले आहे. "हे विमान मुद्दामून आदळण्यात आले असून त्यात प्रमाणाबाहेर इंधन भरले होते," असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. अजित दादांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चाही संपुष्टात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोहित पवारांचे महत्त्वाचे प्रश्न आणि आरोप
रोहित पवारांनी या प्रकरणातील 'तांत्रिक गडबड' समोर आणण्यासाठी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
१. इंधनाचा संशयास्पद साठा
मुंबईवरून उड्डाण करताना विमानात प्रमाणाबाहेर इंधन का भरले होते? टॉयलेटच्या मागे असणाऱ्या जागेत अतिरिक्त कॅनमध्ये इंधन का ठेवले होते? इंधन जास्त असल्यानेच मोठा स्फोट झाला.
२. विमान मुद्दाम आदळले
जर बारामतीत धुके जास्त होते, तर लँडिंगचा धोका का पत्करला? विमान मुद्दामून विशिष्ट पद्धतीने आदळण्यात आल्याचा संशय आहे.
३. ब्लॅक बॉक्सशी छेडछाड
अपघाताच्या ठिकाणी कागद जळालेले नाहीत, पण ११०० अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकणारा 'ब्लॅक बॉक्स' जळला, हे मॅन्युप्युलेशन आहे. एफडीआर आणि व्हॉईस रेकॉर्डिंग नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे.
४. विमानाचे अवैध रजिस्ट्रेशन
N80PQ हा अमेरिकन रजिस्ट्रेशन नंबर असलेला लेअरजेट भारतात रजिस्टर होऊच शकत नाही. डीजीसीएच्या मदतीने कागदपत्रांची हेराफेरी करण्यात आली.
५. सुरक्षेत हलगर्जीपणा
झेड प्लस (Z+) सुरक्षा असताना अजित पवारांना असे विमान का दिले, ज्याच्या इंजिनची क्षमता संपायला अवघ्या ८५ तासांचा अवधी बाकी होता?
६. व्हीएसआर (VSR) कंपनीला अभय
या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला महाराष्ट्रातील अनेक सत्ताधारी नेते उपस्थित होते. या मैत्रीमुळेच कंपनीवर कारवाई टाळली जात आहे का?
७. पायलटचा इतिहास
विमानाच्या पायलटला दारू पिण्याच्या सवयीमुळे यापूर्वी दोनदा निलंबित करण्यात आले होते, तरीही त्याला विमान उडवण्याची परवानगी कशी दिली?
८. तपास यंत्रणांवर निशाणा
"दोन दिवसात येणारा अहवाल अजून का आला नाही? रिपोर्टमध्ये हेराफेरी होत आहे का?" असे सवाल करत रोहित पवारांनी तपासाच्या संथ गतीवर नाराजी व्यक्त केली. जो या घातपातामागे आहे, त्याला वाचवण्याचे काम सरकार करत असल्याचा गंभीर आरोप रोहीत पवार यांनी केला आहे.
'विलीनीकरणाचे प्रकरण आता संपले' - मोठा गोप्यस्फोट
- अजित पवारांच्या निधनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट आणि अजित पवार गट) विलीनीकरणाबाबत अतिशय गुप्त चर्चा सुरू होती हे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
- विलीनीकरणासाठी दोनच शक्यता होत्या; एकतर शरद पवार गटाने एनडीएत सामील होणे किंवा अजित पवारांनी एनडीएबाहेर पडून स्वतंत्र लढा देणे.
- जयंत पाटील यांच्या निवासस्थानी या बैठका पार पडल्या होत्या. भाजप मंत्र्यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास याचे पुरावे मिळतील, असा दावा रोहित पवारांनी केला.
- "अजित दादांच्या निधनानंतर आता विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे संपली आहे. आता सुनेत्रा पवार पक्ष सांभाळत आहेत," असे रोहित पवार म्हणाले.












Click it and Unblock the Notifications