'दादा, तुम्ही भाजपचं सोनं आहात, पण 'बेन्टेक्स'चं काय?' रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर 'बेन्टेक्स' म्हणून जोरदार टीका केली आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे कौतुक केले आणि पडळकरांवर निशाणा साधला.

'बेन्टेक्स'च्या सोन्याचे काय करायचे?
रोहित पवार म्हणाले, "चंद्रकांतदादा, तुम्ही भाजपचे खरे सोनं आहात. तुमच्यासारखे नेते राजकारणात राजकारण आणि समाजकारणात समाजकारण करतात. तुम्ही अनेक वर्षांपासून पक्षात आहात आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून मदत करता, ही गोष्ट आम्हाला आवडते." मात्र, पडळकरांवर टीका करताना ते म्हणाले की, "या जिल्ह्यात काही 'बेन्टेक्स'चे लोक फिरत आहेत. ते खालच्या स्तरावर जाऊन मोठ्या नेत्यांवर टीका करतात. त्यामुळे या 'बेन्टेक्स'च्या सोन्याचे काय करायचे, हे भाजपने लक्षात घेतले पाहिजे."
अजित पवार आणि क्रिकेटच्या भाषेत टीका
रोहित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक दिग्गज नेत्यांचा उल्लेख क्रिकेटच्या भाषेत केला.
- अजित पवार: अजित पवार यांच्यावर टोला मारताना ते म्हणाले, "अजितदादा यॉर्कर टाकणारे फास्ट बॉलर आहेत, त्यांची बॅट्समनला काही प्रमाणात भीती वाटते." पुढे त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. "माझ्या एका भाषणाचे अजितदादांनी कौतुक केले होते, पण लगेचच त्यांनी मला 'शर्टची बटणे नीट लावत जा' असा सल्ला दिला. त्यावेळी ते माझ्यावर इतक्या बारकाईने लक्ष ठेवायचे, पण आता गावकीचा विचार करताना भावकीला विसरले आहेत. त्यांनी निधीच्या बाबतीत विचार करावा," असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.
- जयंत पाटील: जयंत पाटील हे ऑफ स्पिन, लेग स्पिन आणि गुगली टाकण्यात माहीर असल्याचे रोहित पवार म्हणाले. "कधी कधी तर बॉल हातातच असतो, पण आम्हाला बॅट्समनला वाटते की त्यांनी बॉलिंग सुद्धा टाकली," असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांच्या राजकीय शैलीचे वर्णन केले.
- चंद्रकांत पाटील: चंद्रकांत पाटील यांना त्यांनी 'मीडियम पेस बॉलर' असे म्हटले. "ते कधी बॅटिंग करतात, तर कधी बॉलिंग," असे सांगत त्यांनी पाटील यांच्या राजकीय भूमिकेची प्रशंसा केली.
या सोहळ्यात रोहित पवारांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली.












Click it and Unblock the Notifications