मुंबईला मिळाल्या पहिल्या भाजप महिला महापौर; रितू तावडे यांच्या नावाची घोषणा, तर संजय घाडी उपमहापौर!
देशाची आर्थिक राजधानी आणि मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे, तर उपमहापौरपद शिवसेना (शिंदे गट) कडे गेले असून संजय शंकर घाडी या पदाची धुरा सांभाळतील.
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी या महत्त्वपूर्ण नावांची घोषणा केली. येत्या ११ फेब्रुवारी रोजी महापौरपदाची निवडणूक पार पडणार असून, रितू तावडे यांच्या रूपाने मुंबईला भाजपच्या पहिल्या महिला महापौर मिळणार आहेत.

चुरशीच्या लढतीत रितू तावडेंची सरशी
मुंबईचे महापौरपद हे 'सर्वसाधारण महिला' गटासाठी राखीव असल्याने भाजपकडून कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये रितू तावडे आणि शीतल गंभीर यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. अखेर पक्षनेतृत्वाने तावडे यांच्या अनुभवावर विश्वास टाकला. विशेष म्हणजे, रितू तावडे या गुजरातीबहुल घाटकोपर भागातून येत असल्या तरी, भाजपने 'मराठी चेहरा' देऊन विरोधकांच्या टीकेची धार बोथट केली आहे.
कोण आहेत रितू तावडे? (Who Is Ritu Tawade)
रितू तावडे या भाजपच्या अनुभवी आणि अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांची राजकीय कारकीर्द प्रभावी राहिली आहे:
विजयी घोडदौड : त्यांनी २०१२ (प्रभाग १२७), २०१७ (प्रभाग १२१) आणि नुकत्याच झालेल्या २०२५ च्या निवडणुकीत (प्रभाग १३२) सलग विजय मिळवला आहे.
अनुभव : त्यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद अत्यंत कार्यक्षमतेने भूषवले आहे.
प्रतिमा : पक्षातील ज्येष्ठता आणि प्रशासकीय कामाचा अनुभव यामुळे त्या महापौरपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.
घोषणा होताच रितू तावडे काय म्हणाल्या?
"महापौर नव्हे, तर मुंबईची सेवक म्हणून काम करणार" नावाची घोषणा होताच रितू तावडे यांनी अत्यंत नम्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले आहेत. सभागृहाची गरिमा राखून आणि पक्षभेद विसरून मी मुंबईच्या विकासासाठी निर्मळ व प्रामाणिकपणे काम करेन."
उपमहापौरपदी संजय घाडी यांची वर्णी
महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार उपमहापौरपद शिवसेना (शिंदे गट) कडे देण्यात आले आहे. पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते संजय शंकर घाडी यांची या पदासाठी निवड झाली आहे. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असेल, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे.
संजय घाडी यांचा राजकीय प्रवास:
१९८८ पासून भारतीय विद्यार्थी सेनेतून त्यांच्या कार्याला सुरुवात झाली.
मुंबई विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
२०१७ ते २०२२ या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून उत्तम काम केले असून, यंदा त्यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे.
त्यांच्या पत्नी संजना घाडी या शिवसेनेच्या उपनेत्या व प्रवक्त्या आहेत, तर मुलगा सुयश हा युवासेनेची जबाबदारी सांभाळत आहे.












Click it and Unblock the Notifications