आधी लोकसभा आता विधानसभा निवडणुकीतही रिसोडमधून भावना गवळींचा पराभव, पुढे काय?
Risod Assembly Election Result 2024 : वाशीम जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या रिसोड विधानसभा मतदारसंघात अमित झनक यांची बाजी, 6 हजार 136 हजार मतांनी केले चितपट केले.
या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन्ही उमेदवार अत्यंत तगडे आणि मोठे राजकीय परंपरा असलेले होते. एकीकडे अमित झनक यांना वडिलांचा राजकीय वारसा तर भावना गवळी यांनाही राजकीय वारसा आहे, तिसरीकडे टस्सल दिली ती अपक्ष उमेदवार अनंतराव देशमुख या तिरंगी लढतीत भावना गवळींचा पराभव झाला.

भावना गवळी यांचे वडील पुंडलिक गवळी यांनी यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी केली. त्यांचा जिल्ह्यात मोठा लोकसंपर्क होता.पुंडलिक गवळी यांच्या कन्या भावना गवळी यांनी 1999 सालापासून यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2024 पर्यंत त्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात भावना गवळी यांनी शिंदे यांना साथ दिली.
2024 साली त्यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले. मात्र आपल्या सोबत आलेल्या कोणत्याही नेत्याचे नुकसान होणार नाही असे ठाम आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्याच्यानुसार भावना गवळी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हिंगोली जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले.
दुसरीकडे याच विधानसभा मतदारसंघातून लढत असलेले अमित झनक हे काँग्रेसचे उमेदवार देखील तरुण आणि तडफदार कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. आपल्या परिवाराचे ते तिसऱ्या पिढीचे राजकारणी आहेत. त्यांचे वडील सुभाष झनक हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचे अकाली निधन झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत अमित झनक विजयी झाले.
2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणुका अमित झनक यांनी बाजी मारली. ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत. एकेकाळी त्यांच्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची घट्ट मर्जी होती. 2017 साली तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी आणि अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्या प्रकरणी अमित झनक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी तसेच काँग्रेसचे अमित झनक यांच्या व्यतिरिक्त बहुजन समाज पक्षाचे एडवोकेट राहुल गवई, लोकराज्य पक्षाचे गजानन लोखंडे, रिपब्लिकन सेनेचे डॉक्टर चेतन भाई इंगळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे दीपक श्रीराम तिरके, वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत सुधीर गोळे, जनवादी पक्षाच्या संगीता दिनेश चव्हाण आणि अन्य पाच अपक्ष उमेदवार रिंगणात होते.
भावना गवळी यांचा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेचा केला होता. मराठवाड्यातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी भावना गवळी यांच्यासाठी मेहनत घेतली होती. पंचवीस वर्षे जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या भावना गवळी यांना विधानसभेच्या विजयाचा गुलाल लागणार का याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला होती.












Click it and Unblock the Notifications