उद्या कळेल, सिंहासन कुणाचं..? महाराष्ट्र व झारखंडचा उद्या निकाल, वाचा काय आहे स्थिती
Maharashtra Assembly Election 2024- महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच शनिवारी लागणार आहेत. या निवडणुकीसाठी एनडीए व इंडिया आघाडीत जोरदार टक्कर पहायला मिळाली. झारखंडमध्ये दोन टप्प्यात ८१ जागांसाठी, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी ही निवडणूक झाली. दरम्यान, उद्या निकालापूर्वी या दोन्ही राज्यांतील वातावरण तापले असून, सत्ता कुणाची येणार हे समजण्यापूर्वीच दोन्ही गटांकडून आपापल्या आमदारांसाठी रणनिती तयार करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात विक्रमी मतदान
यावर्षी महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडी यांच्या मुख्य लढत झाली. शिवसेना व त्यांनंतर राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या दोन्ही गटांकडून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६५.१ टक्के मतदान झाले. हा आकडा गेल्या तीस वर्षांतील विक्रमी आकडा ठरला. आता हा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
झारखंडमध्ये ६८ टक्के मतदान
झारखंडमध्ये बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांसाठीचे मतदान पार पडले. १.२३ कोटी मतदारांपैकी ६८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या टप्प्यात ४३ जागांसाठी ६६ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. उद्या म्हणजेच शनिवारी झारखंड विधानसभेच्या ८१ जागांचा निकाल हाती येणार आहे. वाढलेल्या मतदानापासूनच तेथे सत्ता कुणाची येणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
निकालापूर्वीच मविआचा मेगा प्लॅन
सत्तास्थापनेसाठी उद्यापासून पुढील चार दिवस शरद पवार हे मुंबईतच तळ ठोकणार आहेत. जिंकून येणाऱ्या बंडखोर व अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्याचे काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर सोपविण्यात आले आहे. काँग्रेसच्या हायकमांडने निकालाआधीच निरिक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक सत्तास्थापनेच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. महाविकास आघाडीचे सगळे आमदार उद्या निकालानंतर मुंबईती हाँटेल ग्रँण्ड हयात येथे राहणार आहेत.
महायुतीचा प्लॅन ए व बी तयार
कुठल्याही परिस्थितीत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीने दोन प्लॅन केले आहेत. स्वबळावर सत्ता आल्यास पुढच्या बारा तासांत महायुती आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. तर प्लँन बी मध्ये काही अपक्ष व छोट्या पक्षांना आपल्यासोबत घेण्याचा विचार सुरु आहे. त्यादृष्टीने महायुतीने सर्व तयारी केली आहे. त्यांचे आमदार निवडून आल्यानंतर सेफ जागेवर ठेवले जातील, अशाही चर्चा आहेत.












Click it and Unblock the Notifications