डॉक्टर ते खासदार ; श्रीकांत शिंदे यांचा प्रवास
Political Career of Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल खूप लोकांना माहिती असली तरी त्यांचे कौटुंबिक आयुष्य फार थोडक्या लोकांना माहित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीन एकनाथ शिंदे नावाचे नेतृत्व आज राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले आहे. एकनाथ शिंदे यांचा संघर्ष जसा राजकीय होता, जसा आर्थिक होता तितकाच तो कौटुंबिक देखील होता.
उपजीविकेसाठी एकनाथ शिंदे रिक्षा चालवायचे हे तर सर्वश्रुत आहेत. आई वडील, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी आणि तीन मुले असे एकनाथ शिंदे यांचे कुटुंब. पण एका दुर्दैवी घटनेत एकनाथ शिंदे यांच्या दोन मुलांचा शिंदे यांच्या डोळ्यासमोरच मृत्यू झाला. आणि एकनाथ शिंदे कोलमडून पडले. त्यांना नैराश्याने ग्रासले. राजकारण सोडून फक्त कुटुंबाकडे लक्ष द्यायचे असा निर्धारच त्यांनी केला होता. पण शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आणि एकनाथ शिंदे यांचे गुरु स्वर्गीय आनंद दिघे यांनी त्या विचारापासून शिंदे यांना परावृत्त केले आणि संघटनेत तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत राहण्याचा आग्रह धरला. त्यांची आज्ञा एकनाथ शिंदे यांनी शिरसावंद्य मानली आणि ते राजकारणातच स्थिरावले.

श्रीकांत शिंदे हे तिसरे अपत्य
एकनाथ शिंदे यांचे तिसरे अपत्य म्हणजे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे होय. श्रीकांत शिंदे हे अभ्यासात लहानपणापासूनच हुशार होते. त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आणि नवी मुंबईच्या डी वाय पाटील मेडिकल कॉलेज मधून त्यांनी एम एस पूर्ण केले. 2014 साली श्रीकांत शिंदे पहिल्यांदा कल्याण डोंबिवली मतदार संघातून खासदार झाले तेव्हा ते मास्टर्स करत होते.
रोचक शैक्षणिक प्रवास
श्रीकांत शिंदे यांचा शैक्षणिक प्रवासही रोचक आणि अनुकरणीय असा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कायम जनतेत मिसळून राहणाऱ्या नेत्याच्या घरात शैक्षणिक वातावरण असणे तसेच कठीणच. त्यात श्रीकांत शिंदे एकुलते एक. दोन भावंडे अपघातात मृत्यू पावलेली. तरीही श्रीकांत शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी करून दाखवला. अर्थात अन्य राजकीय नेत्यांच्या मुलांप्रमाणेच श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणात ओढले गेले. आणि राजकारणातही आपण शिक्षण क्षेत्राइतकेच गुणवान आहोत, हेही त्यांनी सिद्ध केले.
सलग तीनवेळा खासदार
2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनंद परांजपे यांचा दोन लाख 50 हजार मतांनी पराभव केला. त्यावेळी ते अवघ्या 27 वर्षांचे होते. 2014 साली कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला 53 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्येही श्रीकांत शिंदे यांनी विजयाची पुनरावृत्ती करताना तीन लाख 44 हजार मतांनी विजय मिळवला. आणि 2024 च्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत त्यांनी दोन लाखाहून अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. सलग तीन वेळा कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविण्याचा विक्रम आज त्यांच्या नावावर आहे.
कारकीर्द गाजवली
एकनाथ शिंदे यांचा पुत्र एवढीच श्रीकांत शिंदे यांची ओळख नाही. खासदारकीची आपली दहा वर्षाची कारकीर्द श्रीकांत शिंदे यांनी गाजवली. लोकसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात स्वतःचा असा अफाट जनसंपर्क तयार केला. मतदारसंघातील विकास कामांना आणि पायाभूत सुविधांना मोठी गती दिली. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींना बळ दिले. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणतात, "पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझा मुलगा एवढीच श्रीकांत शिंदे यांची ओळख होती, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मला फारसे मतदारसंघात लक्ष घालावे लागले नाही आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मी कल्याण डोंबिवली कडे लक्षही दिले नाही इतके श्रीकांत शिंदे यांचे काम चांगले आहे" विविध संस्था, मंडळे, आस्थापना, यांच्याशी श्रीकांत शिंदे यांनी निकटचा संबंध प्रस्थापित केला,आणि त्यांच्या विविध उपक्रमात देखील सहभाग घेतला. मतदारसंघात रस्ते, रुग्णालय, रेल्वे स्थानक विषयक सुविधा, अशा विविध प्रकल्पांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले.
श्रीकांत शिंदे फौंडेशन
राजकारणात असलेले डॉक्टर श्रीकांत शिंदे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन वैद्यकीय मदतीच्या क्षेत्रात विशेष कार्यरत आहे. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे घेणे, रुग्णवाहिका देणे, उपचारांसाठी गरजूंना मदत करणे अशी अनेक कामे श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केली जातात. आणि या सामाजिक तसेच वैद्यकीय उपक्रमांचे लाभार्थी श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे कौतुक करीत असतात.
आव्हानाच्या काळात पित्याला भक्कम साथ
2022 साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात श्रीकांत शिंदे यांनी खंबीर पुत्र म्हणून एकनाथ शिंदे यांना भक्कम साथ दिली. 20 जून 2022 पासून ठाण्याबाहेर असलेले एकनाथ शिंदे यांना परतल्यानंतर कसा प्रतिसाद मिळेल, याची चर्चा महाराष्ट्रभरात होती. परंतु भर रस्त्यात वाहनावर उभे राहून त्यांनी ठाण्यात प्रचंड मोठी सभा घेतली आणि शंका घेणाऱ्यांचे तोंड बंद झाले. त्यानंतर शिंदे यांच्यासोबत आलेल्या विविध आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणे, संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून घेणे, मुख्यमंत्री यांच्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही, त्याचा अभ्यास करणे यात शिंदे यांनी लक्ष घातले.
लोकसभा निवडणुकीत दौरे
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच श्रीकांत शिंदे यांनीही झंजावाती दौरे काढून आपल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या. उमेदवारांना कोणतीही कमी पडू नये याकडे श्रीकांत शिंदे यांचे लक्ष होते. लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे सरकारने विविध योजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली. त्याकडेही श्रीकांत शिंदे यांनी लक्ष दिले. विशेषतः माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या लाभार्थींशी श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधून महिलांची आपुलकीने चौकशी केली. माध्यमांच्या विविध व्यासपीठावर श्रीकांत शिंदे यांनी सरकारची आणि महायुतीची बाजू जोरदारपणे मांडली.
लक्षवेधी प्रवास
आता विधानसभा निवडणुकीदेखील श्रीकांत शिंदे बारकाईने लक्ष देत आहेत. ठिकठिकाणी त्यांच्या प्रचार सभा होत आहेत. विशेषतः युवा पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. अवघ्या 37 वर्षांचा हा तरुण अत्यंत जबाबदारीने पित्याच्या कामात खांद्याला खांदा लावून काम करतो आहे. डॉक्टर ते सलग तीन वेळचे खासदार असा हा प्रवास लक्षवेधी आहे.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications