भाजपची रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी; प्रदेशाध्यक्षपदापूर्वी 'या' पदावर नियुक्ती
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचे नाव फायनल झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता हे पद मिळण्यापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्ध केले आहे.

चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी
भाजपच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा आज केली. रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षांप्रमाणेच आता त्यांच्याकडे अधिकार राहणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रभारी म्हणून नियुक्ती
एकनाथ शिंदे सरकारमध्ये रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. यंदा डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांना संधी मिळाली नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात महसूलमंत्रीपद मिळाले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी आता रवींद्र चव्हाण असतील, अशा चर्चा सुरु झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी किंवा जानेवारीत शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या अधिवेशनात चव्हाण यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यापूर्वी आता भाजपने त्यांना महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications