महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड; जाणून घ्या त्यांच्याविषयी
Ravindra Chavan : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक जारी केले. त्यामुळे रवींद्र चव्हाण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणार हे निश्चित झाले आहे.
रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात नाही मिळाले स्थान
शिंदेंच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद सांभाळलेल्या रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे थोडे नाराज झालेल्या चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांच्यावर कार्यकारी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दुसरीकडे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अजूनही चंद्रशेखर बावनकुळे हेच असणार आहेत. आता ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत या पदावर असू शकतात.

रवींद्र चव्हाण कोण आहेत?
रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते 2009 पासून सलग 4 वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निडवणुकीत त्यांनी 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवलं होतं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
2009 साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले
2009 साली कल्याण विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन डोंबिवली हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांनी वर्चस्व मिळवलं आणि मोठा विजय देखील मिळवला. त्यानंतर 2016 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकी मिळवण्याची हॅटट्रीक पूर्ण केली.












Click it and Unblock the Notifications