रतन टाटा प्रेमात पडूनही अविवाहित का राहिले? त्यांच्या लग्नाचा आणि भारत - चीन युद्धाचा काय संबंध आहे?
Know about Ratan Tata's love story and family : टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा हे उद्योगविश्वाचा एक सेलिब्रिटी चेहरा होते. त्यांच्या कामाबद्दल तर आपल्याला माहिती आहेच पण रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्याला तेवढी माहिती नाही. रतन टाटा आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या तरुणपणी ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. खुद्ध रतन टाटा यांनीच त्यांच्या या अधुऱ्या प्रेमकहाणीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

रतन टाटा अमेरिकेत लाॅस एंजेलिसमध्ये एका आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते तेव्हा ते एका तरुणीच्या प्रेमात पडले होते. त्यांना या तरुणीसोबत लग्नही करायचं होतं पण त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. रतन टाटा यांची आजी आजारी असल्याने तिची काळजी घेण्यासाठी त्यांना भारतात परत यावं लागलं. रतन टाटा नंतर पुन्हा अमेरिकेत जाऊन त्या तरुणीला भेटले आणि तिच्यासोबत भारतात येऊन स्थायिक व्हायचं, असंही त्यांनी ठरवलं होतं. पण ते होऊ शकलं नाही.
भारत आणि चीनच्या 1962 च्या युद्धानंतर त्या तरुणीचे आईवडील तिला भारतात पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे रतन टाटा एकटेच भारतात परतले. त्यानंतर रतन टाटा आणि या तरुणीची ताटातूट झाली ती कायमचीच. ही तरुणी कोण आहे, तिचं नाव काय हे मात्र आजतागायत कुणालाही माहीत नाही.
रतन टाटा 10 वर्षांचे होते तेव्हा त्यांचे वडिल नवल टाटा आणि आई सोनू टाटा हे विभक्त झाले. त्यानंतर रतन टाटा यांचा सांभाळ त्यांची आजी नवजीबाई यांनी केला. नवजीबाई यांनी रतन टाटा यांना औपचारिकपणे दत्तक घेतलं होतं. रतन टाटा बालपणापासूनच आपल्या आजीच्या जवळचे असल्याने तिच्या वृद्धापकाळात तिची काळजी घेणं त्यांना सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. त्यासाठी त्यांनी आपल्या प्रेमाचा त्याग करायलाही मागेपुढे पाहिलं नाही.
रतन टाटा यांच्या आयुष्यात त्यानंतरही तीन वेळा लग्नाची संधी आली पण वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांचं लग्न होऊच शकलं नाही. हा एवढा मोठा उद्योगपती निरंतर आपल्या कामावर प्रेम करत राहिला. रतन टाटा यांनी अलीकडेच प्राण्यांसाठीचं मोठं हाॅस्पिटलही सुरू केलं आहे.
रतन टाटा यांचा परिवार जगभर पसरलेला आहे. अगदी शेवटपर्यंत त्यांच्याभोवतीचं वलय कायम राहिलं पण या संस्कारी उद्योगपतीने एवढ्या सगळ्या प्रसिद्धीच्या, माणसांच्या गराड्यामध्ये अमेरिकेतल्या प्रेमकहाणीचा एक हळवा कोपरा मात्र मनात जपून ठेवला होता...












Click it and Unblock the Notifications