छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला दणका! भाजपाच्या 'या' नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)मध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी उपमहापौर, राजू शिंदे आणि काही प्रमुख नेते तसेच काही महत्वाचे पदाधिकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

यामध्ये काही माजी नगरसेवकांचाही समावेश असून त्यांचा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत स्वत: राजू शिंदे यांनी ट्टिट करुन माहीती दिली आहे. राजू शिंदे यांनी आपल्या एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ''आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आपण या आधी मला जशी साथ दिली तशीच आपण पुढे देखील द्याल हीच इच्छा..!!''
आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आपण या आधी मला जशी साथ दिली तशीच आपण पुढे देखील द्याल हीच इच्छा..!!
— Raju Shinde (@shinde_Raju1) July 7, 2024
आपला राजू शिंदे pic.twitter.com/LRizEFoT86
काय म्हणाले राजू शिंदे
आता माघार नाही..! असे म्हणत ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी राजू शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी ठाकरे गटात प्रवेश करीत आहे. भाजप शहर आणि जिल्ह्यात फक्त शिंदे गटाचेच काम करण्यापुरताच आहे. लोकसभेच्या जागेसाठी भाजपने दोन अडीच वर्ष भरपूर काम केले पण ऐनवेळी ती जागा शिंदे गटाला दिली गेली. आता मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश करत आहे. आपण जी मला साथ दिली यापुढेही देताल हीच इच्छा.., असे म्हणत पदाधिकारी आणि जनतेला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न राजू शिंदे यांनी केला आहे.
राजू शिंदेंनी लढवली होती अपक्ष निवडणूक
सन 2019 ला विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमधील पश्मिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात तेव्हाच्या शिवसेनेचे आणि आताच्या शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे होते. राजू शिंदे यांना त्या निवडणूक यांना सुमारे 43 हजार मते मिळाली होती.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना याच पश्चिम मतदारसंघातून 58 हजार 382 मते मिळाली आहेत. त्यावरच राजू शिंदे यांचे विजयाचे गणित आहे.यावेळी राजू शिंदे यांना उद्धव ठाकरे संधी देतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासमोर आव्हान उभे राहील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राजू शिंदेंसोबत यांचाही ठाकरे गटात प्रवेश
गोकुळ मलके, रूपचंद वाघमारे, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, प्रल्हाद निमगावकर यांच्यासह दोन तालुकाप्रमुख, मंडळ अध्यक्ष, ओबीसी सेलचे पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे पदाधिका-यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
भाजपने थांबवण्याचा केला होता प्रयत्न
माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार हरीभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेकांनी राजू शिंदे यांनी भावनिक साद घालत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसंकल्प मेळाव्यात त्यांनी प्रवेश केला.
दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिंदे व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तब्बल तीन बैठका झाल्या. संध्याकाळी बागडे यांची धर्मवीर संभाजी शाळेत झालेली बैठक अतिशय भावनिक झाली. या वेळी शिंदे निर्णय बदलतात की काय अशी चर्चा होती. मात्र अखेर कार्यकर्त्यांशी बोलून त्यांनी उबाठा गटात जाण्याचा निर्णय घेतला.












Click it and Unblock the Notifications