परळीत शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक; फडांना नाकारले, देशमुखांना उमेदवारी दिल्याने बॅनर फाडले
Parli Vidhansabha Election : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतीच उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात परळीमधून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.
या घटनेने परळी विधानसभा मतदारसंघात अंतर्गत वाद उफाळला आहे. परळी येथील शरद पवार यांच्या पक्ष कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तर पवारांचे लावलेले बॅनर देखील फाडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक आणि संभाव्य उमेदवार असलेल्या राजेभाऊ फड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजेभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवारांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत.त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत वाद उफाळून आला असल्याचे बोलले जात आहे.
मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळणार?
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवार देतात? त्याची उत्सुकता लागली होती. अशातच आता शरद पवारांनी या मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
कोण आहेत राजेसाहेब देशमुख
मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सक्रिय काम करत आहेत. स्वर्गीय विमल मुंदडा त्यांचे समर्थक म्हणून ओळखले जायचे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण सभापती पद भूषविले आहे. मागील अनेक वर्षांपासून ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला त्यात जरांगे फॅक्टर आघाडीवर होता. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे संघर्ष पाहायला मिळाला होता. तर आता परळी मतदारसंघ मराठा बहुल आहे. त्यामुळे राजेसाहेब देशमुख यांचे वैयक्तिक संबंध असल्याने या ठिकाणाची लढत ही रंगतदार होणार आहे.












Click it and Unblock the Notifications