राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐक्याची इनसाईड स्टोरी, शिवतीर्थ ते मातोश्री काय घडलं?
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंही एकत्र दिसणार आहेत. ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र आणणाऱ्या या घडामोडींचा उलगडा खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

सगळं कसं घडलं?
संजय राऊत यांनी सांगितले की, काल (गुरुवारी) राज ठाकरे यांना सरकारमधील काहीजण भेटायला गेले होते. त्याच वेळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मराठी भाषा कृती समितीचे प्रतिनिधी आले होते. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी ६ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली.
"त्यावेळी आम्ही मातोश्रीवरच्या बैठकीत होतो. मोर्चाबाबत काहीही माहिती नव्हती. बैठक आटोपल्यानंतर मला राज ठाकरेंचा फोन आला. ते म्हणाले - 'तुमचं आंदोलन ७ तारखेला, आणि मी ६ तारखेला जाहीर केलंय. दोन वेगळ्या मराठी मोर्च्यांचं दृश्य जनतेपुढे जाणं योग्य नाही. एकत्र आलो तर परिणाम जास्त होईल, आणि जनतेलाही समाधान वाटेल'," असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
मातोश्रीवर झाली अंतिम चर्चा
यानंतर संजय राऊत पुन्हा मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांचा संदेश दिला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी राज ठाकरेंशी फोनवर बोललो. जर आपण खरंच एकत्र आलो, तर हे मराठी माणसाच्या ऐक्याचं प्रतीक ठरेल. तसंच ७ जुलै ही आषाढी एकादशी असल्याने, मोठ्या धार्मिक कार्यक्रमामुळे आपलं आंदोलन कमी लोकांपर्यंत पोहोचेल. त्यामुळे आपण तारीख ५ जुलै करावी."
राज ठाकरेंचा लगेच प्रतिसाद
राऊत पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचं म्हणणं ऐकल्यानंतर मी पुन्हा राज ठाकरे यांना फोन केला. उद्धवजींचं मत त्यांना सांगितलं. त्यावर राज ठाकरेंनीही कोणताही आडपडदा न ठेवता लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी काही वेळात परत फोन केला आणि सांगितलं की ५ जुलैलाच आपण संयुक्तरित्या मोर्चा काढू."
मराठी एकतेचा नवा अध्याय?
संजय राऊतांच्या खुलाशानंतर, राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता बलवत्तर झाली आहे. मराठी भाषेच्या हक्कासाठी पुकारण्यात आलेल्या या मोर्चातून केवळ भाषिक मुद्दाच नव्हे, तर एका नव्या राजकीय समीकरणाचा आरंभ होणार का?, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.












Click it and Unblock the Notifications