अखेर ठरलं! राज ठाकरे- उद्धव ठाकरे एकत्र येणार? राज यांनी दिली 'ही' हिंट, प्रस्ताव दिल्याच्याही चर्चा
शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची वाताहत झाली. मात्र आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांचा मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

नेमके काय झाले?
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची 'वास्तव मे ट्रूथ' या यू-ट्यूब चॅनलला मुलाखत घेतली. मांजरेकर यांनी विचारलेल्या एका प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत भाष्य केले. सर्व मराठी माणसांनी एकच पक्ष काढावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवाय त्यांनी अनौपचारिकपणे उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्तावही दिला.
काय म्हणाले राज ठाकरे?
अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न मांजरेकर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यात काहीही किंतू-परंतु नाहीत, हे स्पष्ट केलं.
काय केले आवाहन?
राज ठाकरे पुढे म्हणाले की, हा विषय फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे. तो मी पाहतो. माझं म्हणणं आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. त्यातून महाराष्ट्राचा विकास साधावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिंदेंच्या बंडावरही भाष्य
मुलाखती दरम्यान राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावरही भाष्य केले. ते म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत नाही. शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं. शिंदेंनी केलेलं बंड मलाही करणं शक्य होतं. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. पण बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता, असे राज यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications