देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेताच राज ठाकरेंच्या शुभेच्छा अन् दिला एक इशारा, म्हणाले- चुकीची जाणीव...
Raj Thackeray congratulates Chief Minister Devendra Fadnavis and gives warning : महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात जल्लोष साजरा केला जात आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडताच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारला व देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना एक इशारा देखील दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, 'आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो.

'पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा.' असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
काही कारणामुळे राज ठाकरे नाही आले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील आजच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. पण शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर त्यांनी तिन्ही मंत्र्यांचं अभिनंदन केले आहे.












Click it and Unblock the Notifications