राज्यात राजकीय भूकंप होणार! राज-उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट; 3 महिन्यांपासून दोघा भावांत काय शिजतंय!
Raj Thackeray and Uddhav Thackeray meet again : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेचा दारुण पराभव झाला. तर उद्धव ठाकरे यांची देखील पिछेहाट झाली. तर या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या विरोधात दुश्मनासारखे लढले. अशातच, दोन्ही भावांची एकत्र येऊन भेट होत असेल तर राजकीय वर्तुळातील मोठी बातमी आहे.
अशीच घटना रविवारी दि.23 फेब्रुवारी रोजी घडली. दोन्ही भाऊ एकत्र आले होते ते एका लग्नसोहळ्यासाठी. परंतु, ही केवळ कालचीच गोष्ट नव्हती. गेल्या तीन महिन्यात राज व उद्धव ठाकरे यांची ही तिसरी भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तर मनपा निवडणुकीच्या आधी राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नेमकं काय घडलं, कशी झाली दोघा भावांची भेट?
विधानसभा निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाला मोठ्या अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. ठाकरे गटाचे तर आजवरच्या निवडणुकीतील सर्वात कमी आमदार निवडून आले. तर मनसेला साधं खातंही उघडता आलं नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही विजयी होऊ शकले नाही. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही लोकांनी तर बॅनर लावून या दोन्ही भावांना एकत्र यावे म्हणून साकडं घातलं आहे. पण दोन्ही भावांकडून त्याला काही प्रतिसाद देण्यात आलेला नसला तरी पुन्हा एकदा सुखद चित्र पाहायला मिळालं. दोन्ही भाऊ एकत्र आले. गप्पा मारल्या, हास्य विनोदात रमले. तेही एका लग्नाच्या निमित्ताने. त्यांचे फोटोही व्हायरल झाले असून अनेकांना हे फोटो पाहून आनंद झालाय. तर विरोधकांच्या पोटात मात्र गोळा उठल्याशिवाय राहिला नसेल.

अन् कॅमेऱ्यामॅनने गर्दी केली, दोघांना एकत्र पाहण्याची संधी
राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे लग्नात भेटल्यानंतर तिघेही गप्पा मारताना दिसले. तिघांमध्ये चांगलाच हास्यविनोद रंगला होता. तिघेही एकाच फ्रेममध्ये आल्यानंतर कॅमेरामनची फोटो काढण्यासाठी एकच तारांबळ उडाली. तिघांचीही हास्यविनोद करतानाची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी कॅमेरामन सरसावले होते. क्षणार्धात कॅमेऱ्याचा कडकडाट सुरू झाला. मात्र, तिघांनीही कॅमेऱ्यांकडे न पाहता गप्पा मारणं सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे आता दोन्ही बंधू मराठी माणसांसाठी एकत्र येणार का? असा सवाल केला जात आहे.
दोघा भावांची कधी व कुठे झाली होती भेट?
15 डिसेंबर 2024
मुंबईतील ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली होती.
22 डिसेंबर 2024
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बहीण जयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात हे लग्न लागले. या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले होते.
23 फेब्रुवारी 2025
शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्नात अंधेरी येथे भेट आणि मन मोकळ्या गप्पा. यावेळी रश्मी ठाकरे यांची देखील उपस्थिती होती. ठाकरे कुटुंब एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणात वेगळं चित्र पाहायळा मिळेल, असेही बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications