शिवसेना-भाजप ते NCP आता फडणवीसांचे विश्वासू! वाचा- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कारकिर्द
Rahul Narvekar Profile : भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. एकमेव अर्ज असल्याने राहुल नार्वेकरांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. चला तर जाणून घेऊया, त्यांची राजकीय कारकिर्द कशी राहिली.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि त्यानंतर भाजपबरोबर जात सरकार स्थापन केले. यानंतर विधानसभा अध्यक्षपद हे भाजपनं त्यांच्याकडे घेतलं होतं. यावेळी भाजपनं आमदार राहुल नार्वेकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. फक्त नावाचा घोषणा होणेच बाकी आहे.

आज उमेदवारी अर्ज भरण्याची दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत होती. या काळात महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
तर राहुल नार्वेकर नेमकं आहेत तरी कोण?, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय?
राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेमधून झाला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही कार्यरत होते. राहुल नार्वेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. इंग्रजी वृत्तवाहिन्यांमधील चर्चात्मक, वादविवाद कार्यक्रमात राहुल नार्वेकर हे शिवसेनेची बाजू मांडत असे.
एकप्रकारे ते न्यूज डिबेटमध्ये शिवसेनेचा चेहरा होते. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं.अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे.
मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. पुढे राहुल नार्वेकर यांना शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर पाठवलं जाऊ लागलं.
राहुल नार्वेकर यांच्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणाले, "राहुल नार्वेकर आज भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार असले तरी ते सर्वप्रथम एक शिवसैनिक होते."राहुल नार्वेकर यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत अपक्ष म्हणून निवडून येत असत. त्यांचे भाऊ मकरंद आणि वहिनी हर्षिता या सध्या मुंबई महापालिकेत भाजपचे नगरसेवक म्हणून काम करत आहेत.
2014 मध्ये शिवसेना सोडून राष्ट्रवादीत केला होता प्रवेश
राहुल नार्वेकर यांनी 2014च्या सुमारास शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून विधान परिषदेला नकार दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी चर्चा होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात कामगिरी बजावली.
2014 ते 2019 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात नार्वेकर यांना 'उत्कृष्ट भाषणा'साठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मे 2016 मध्ये राष्ट्रकूल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड आणि सिंगापूरचा अभ्यास दौराही केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा यांचा पराभव केला.
अनेक कायदेशीर पेचमुळे त्यांची झाली होती निवड
राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.
राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील मुंबई महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल नार्वेकर हे आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वांत तरूण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. तरुण सहकारी म्हणून विधान परिषद तसंच विधानसभेच्या सभागृहात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं होतं. कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष राज्याला मिळाले आहेत.












Click it and Unblock the Notifications