विजय शिवतारे पराभवाचा वचपा काढणार; पुरंदरमधील नवीन नवी समीकरणे महायुतीच्या पथ्यावर
2019 पर्यंत महाराष्ट्रात शिवसेना भाजपा - युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी असे दोन प्रमुख राजकीय प्रवाह होते. त्यात शिवसेनेचा सर्वाधिक सामना व्हायचा तो राष्ट्रवादी काँग्रेसशी. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या प्रमुख लढती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांबरोबरच होत होत्या. त्यातही पुणे जिल्हा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला. त्या बालेकिल्ल्यात शरद पवारांशी किंवा अजित पवारांशीट क्कर घेणे हे तसे जोखमीचे काम. पण पवारांना थेट भिडलेला शिवसेनेचा नेता म्हणजे विजय शिवतारे.
पवार कुटुंबाशी थेट सामना
पुरंदर हवेली मधून दोन वेळा आमदार असलेल्या विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांना नेहमीच थेट टार्गेट केले. पवारांचे आर्थिक व्यवहार, पवारांचे साखर कारखाने, पवारांच्या शिक्षण संस्था, पवारांचे उद्योग या सगळ्यावरच विजय शिवतारे यांनी चौफेर हल्ला चढवला. त्यातूनच शिवतारे विरुद्ध पवार हा संघर्ष पुणे जिल्ह्यात शिगेला पोहोचला. विजय शिवतारे यांना पाडायचेच, असा चंगच अजित पवार यांनी बांधला होता. 2009 आणि 2014 अशा दोन वेळी विजय शिवतारे राष्ट्रवादीशी संघर्ष करून निवडून आले. 2014 साली देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांना जलसंधारण खातेही देण्यात आले होते. 2019 साली मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रयत्न करून विजय शिवतारे यांचा पाडाव केला आणि ती जखम शिवतारे यांच्या मनावर कायमची कोरली गेली.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा
2022 साली राजकीय परिस्थिती बदलली आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून नवे आव्हान निर्माण केले. शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच देण्यात आले आणि शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपच्या पाठिंब्यावर झाले. विजय शिवतारे हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. 2023 साली महाराष्ट्रात आणखी एक उलटफेर झाला आणि अजित पवार हे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस घेऊन सरकारमध्ये सहभागी झाले. 2019 नंतर अवघ्या चार वर्षात महाराष्ट्रात सहा प्रमुख पक्ष तयार झाले आणि परस्परांना भिडले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना झाला. पराभवाचे सगळे उट्टे काढण्याची संधी विजय शिवतारे यांना चालून आली. आणि त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे घोषित करून महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांच्याही गोटात हाहाकार उडवून दिला. शिवतारे यांच्या अनंत मिनतवाऱ्या करण्यात आल्या. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही मध्यस्थी करून अजित पवार आणि विजय शिवतारे हा वाद मिटवला आणि शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. पण दुर्दैवाने सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
पुरंदर हवेलीत प्रचंड विकासकामे
सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, प्रकृतीच्या समस्या कितीही असो, विजय शिवतारे यांनी पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे उन्नतीसाठी अथक प्रयत्न केले. पुरंदरच्या विकासासाठी अनेक शासन आदेश त्यांनी स्वतःच्या पाठपुराव्यातून निर्गमित करून घेतले. फुरसुंगी उरळी देवाची या स्वतंत्र नगर परिषदेसाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला आणि स्थानिक नागरिकांना जाचक करातून मुक्ती मिळवून दिली. सासवड शहरासाठी 143 कोटींची नवीन पाणी योजना आणि आठ कोटींची विकास कामे मंजूर करून घेण्यात शिवतारे यांना यश आले. त्याचप्रमाणे जेजुरी शहरासाठी 78 कोटींची नवीन पाणी योजना आणि साडेपाच कोटींची विकासकामे शिवतारे यांनी पाठपुरावा करून मंजूर करून घेतली. मावडी येथील 24०० एकर जमीन एमआयडीसी मधून वगळण्यासाठी विजय शिवतारे यांनी प्रयत्न केले. गुंजवणी जलवाहिनी मूळ आराखड्यानुसार वाल्हे पारींचे वाड्यावस्त्यांच्या उत्तर बाजूने नेण्यासाठी शिवतारे यांनीच प्रयत्न केले.
फुरसुंगी पाणी योजनेसाठी विशेष प्रयत्न
पुणे शहराचा सातत्याने विस्तार होत आहे. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अन्य गावांचा कर पूर्वीप्रमाणे कमी करून घेण्यासाठी विजय शिवतारे यांचा पाठपुरावाच कारणीभूत ठरला. फुरसुंगी गाव पाणी योजनेसाठी 100 कोटींच्या विशेष निधीची तरतूद करून घेण्यासाठी शिवतारे यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
नाही मंत्री, नाही आमदार ... तरीही
स्वतः सत्तेत नसतानाही सरकार दरबारी पाठपुरावा करून शिवतारे यांनी अशा अशा असंख्य योजना आपल्या मतदारसंघासाठी मंजूर करून घेतल्याआहेत. " नाही मंत्री, नाही आमदार, नाही खासदार, पण काम मात्र दमदार, विजय बापू हेच पुरंदरचे खरे शिलेदार" अशी टॅगलाईन वापरून विजय शिवतारे यांनी आपल्या कामांची जाहिरात केलेली आहे. धडपडून काम करणारा आणि विकासासाठी कोणत्याही आव्हानाशी भिडणारा जबाबदार नेता अशी पुरंदर परिसरात विजय शिवतारे यांची ख्याती आहे. रोखठोक आणि स्पष्टवक्ता तसेच अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभ्यासपूर्ण मुलाखती देऊन त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली तसेच पवारांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले.
पुन्हा पुरंदरच्या रिंगणात
2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी विजयबापू शिवतारे यांना पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तिथे काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत जुने वैरी आता मित्र झाले आहेत आणि जुने मित्र विरोधी गटात गेलेले आहेत. पण नव्या मित्रांच्या सोबतीने आणि व्यक्तिगत कामाच्या जोरावर विजय शिवतारे पुरंदर मध्ये आपल्या पराभवाचा वचपा काढतील असा विश्वास महायुतीचा कार्यकर्त्यांना वाटत आहे.












Click it and Unblock the Notifications